गडचिरोलीत पुन्हा ७१ जवान कोरोनाबाधित; एकूण आकडा ४२४ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 18:05 IST2020-07-22T18:05:13+5:302020-07-22T18:05:32+5:30
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियानासाठी कार्यरत राज्य राखीव पोलीस दलाचे अजून ७१ जवान कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४२४ वर पोहोचला आहे.

गडचिरोलीत पुन्हा ७१ जवान कोरोनाबाधित; एकूण आकडा ४२४ वर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियानासाठी कार्यरत राज्य राखीव पोलीस दलाचे अजून ७१ जवान कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४२४ वर पोहोचला आहे. त्यात २८६ सुरक्षा दलाचे जवान आहेत.
आतापर्यंत केंद्रीय व राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांसह २ सीमा सुरक्षा दलाचे जवान मिळून २८६ जवानांना कोरोनाने ग्रासले आहे. हे सर्व जवान आपापल्या गृहजिल्ह्यातून आल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी विलगिकरणात होते. त्यांची स्वॅब चाचणी घेण्यात आली. त्यातील अनेक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
जिल्ह्यात आतापर्यंत १७३ लोक कोरोनामुक्त झाले असून सध्या अॅक्टिव्ह रुग्ण २५० आहे. कोरोनामुळे मृत्यू ओढवण्याचे प्रमाण जिल्ह्यात नगण्य आहे. गेल्या चार महिन्यात जिल्ह्यातील केवळ एका रुग्णाचा हैदराबाद येथे मृत्यू झाला.
नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह
कोरोनाचे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांचे प्रमाण कमी झाले आहे. परंतू २८ जुलै ते ३ आॅगस्ट यादरम्यान नक्षलवादी दरवर्षी शहीद सप्ताह साजरा करतात. यावर्षीही त्यासंदर्भातील बॅनर काही ठिकाणी लागले आहेत. एकीकडे सुरक्षा दलाचे जवान संस्थात्मक विलगिकरणात बांधल्या जाऊन कोरोनाबाधित होत असताना तिकडे नक्षलवादी डोके वर काढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.