तेंदू संकलनात ९८ ग्रामसभांचे पाऊल पुढे

By Admin | Updated: February 24, 2015 02:04 IST2015-02-24T02:04:18+5:302015-02-24T02:04:18+5:30

पेसा कायद्याची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यात १३१३ गावांमध्ये झालेली आहे.

Further progress of 98 gram sabhas in Tenu collection | तेंदू संकलनात ९८ ग्रामसभांचे पाऊल पुढे

तेंदू संकलनात ९८ ग्रामसभांचे पाऊल पुढे

दिगांबर जवादे ल्ल गडचिरोली
पेसा कायद्याची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यात १३१३ गावांमध्ये झालेली आहे. या गावांना गौण वनोपज संकलन व विक्रीचा अधिकार आहे. मात्र आपल्या अधिकाराचा वापर करण्यासाठी फक्त ९८ ग्रामसभांनी पुढाकार घेतल्याची माहिती मिळाली आहे. तब्बल १२१३ ग्रामसभांनी आपल्या हद्दीत वन विभागाने तेंदू संकलनाचे काम करावे, असे शासनाला कळविले आहे. तर जिल्ह्यातील दोन ग्रामसभांनी कुठलीही माहिती कळविली नसल्याने त्या स्वत: आपल्या अधिकाराचा वापर करतील, असे प्रशासनाने गृहीत धरले आहे.
९ जून २०१४ च्या राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार गडचिरोली जिल्ह्यात पेसा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या कायद्यांतर्गत अनुसूचित क्षेत्रात (आदिवासी बहूल) ग्रामसभांना वनोपज संकलन व विक्री याचे अधिकार बहाल करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून असलेला तेंदूपत्ता व्यवसाय या अधिकारामुळे आता ग्रामसभांच्या हाती गेला आहे.
त्यामुळे अधिसूचनेनुसार शासनाने ग्रामसभांना तेंदूपत्ता संकलन करणार किंवा नाही याविषयी स्पष्ट करण्याचे आदेश १९ जानेवारी २०१५ च्या जीआरनुसार दिले होते. त्यानुसार १३१३ ग्रामसभांपैकी ९८ ग्रामसभांनी तेंदूपत्ता संकलनाचे काम स्वत: करण्यास पुढाकार घेणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या मार्फतीने वन विभागाला कळविले आहे. तर १२१३ ग्रामसभांनी वन विभागानेच आमच्या हद्दीत तेंदूपत्ता संकलनाचे काम करावे, याला संमती दर्शविली आहे. त्यामुळे आता वन विभाग १२१३ गावाच्या हद्दीतील तेंदू युनिटाचा निविदा काढून लिलाव प्रक्रिया पार पाडेल तर कुरखेडा तालुक्यातील शिरपूर व चामोर्शी तालुक्यातील गरंजी या दोन ग्रामसभांनी जिल्हा परिषदेकडे होकार किंवा नकार कळविणारा प्रस्ताव सादर केला नाही. त्यामुळे या गावांचा तेंदू संकलनासाठी पुढाकार राहणार आहे, असे जिल्हा परिषद प्रशासनाने गृहीत धरले आहे.
शासनाच्या आदेशानुसार अशी परिस्थिती उद्भवल्यास सदर ग्रामसभा हे काम करणार, असे निश्चित करावे, असे दिशा निर्देश देण्यात आले आहे. शासनाने गावांना अधिकार देण्याची तयारी दाखविली असली तरी तेंदूपत्ता संकलनाच्या कामात मात्र तब्बल १२१३ गावांनी दाखविलेला नकार चिंतेची बाब आहे.

४गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ९८ ग्रामसभा यावर्षी पहिल्यांदा तेंदूपत्ता संकलनाचे काम स्वत: करणार आहे. त्यामुळे या कामाचा त्यांचा अनुभव तांत्रिक ज्ञान याचा अभाव मोठ्या प्रमाणावर राहणार आहे. ही बाब लक्षात घेऊन वनविभागाने या ग्रामसभांना तांत्रिक ज्ञान देण्यासाठी व्यवस्था केलेली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
जिल्हा परिषदला उघडावे लागणार पेसा-तेंदू-लेखा २०१५ हंगाम खाते
४अनुसूचित क्षेत्रातील तेंदूपान विक्रीपासून मिळणारा महसूल संबंधित पंचायत/ग्रामसभा यास वितरित करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी पेसा-तेंदू-लेखा २०१५ हंगाम या नावाने राष्ट्रीयकृत बँकेत एक खाते सुरू करावे, असे आदेश ग्राम विकास विभागाच्या प्रधान सचिवांनी जिल्हा परिषदेला दिले आहे. सदर खाते मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य वनसंरक्षक यांच्या संयुक्त सहिने चालविले जाणार असून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी तेंदूपान विक्रीपासून प्राप्त झालेली निव्वळ रक्कम संबंधित ग्रामसभास देण्याबाबत कारवाई करावी, असेही दिशा निर्देश देण्यात आले आहे.

Web Title: Further progress of 98 gram sabhas in Tenu collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.