नक्षलवादाच्या बिमोडासाठी संपूर्ण सहकार्य

By Admin | Updated: October 25, 2016 00:53 IST2016-10-25T00:53:42+5:302016-10-25T00:53:42+5:30

नक्षलवादाचे फलीत शून्य आले असून याला चळवळ म्हणणाऱ्यांनी बाहेर पडून मुख्य प्रवाहात यावे, यासाठी मी आवाहन करतो, ..

Full cooperation for Naxalism bimaoda | नक्षलवादाच्या बिमोडासाठी संपूर्ण सहकार्य

नक्षलवादाच्या बिमोडासाठी संपूर्ण सहकार्य

हंसराज अहीर यांची ग्वाही : अग्निपंख उपक्रमांतर्गत मदतीचे वाटप
अहेरी : नक्षलवादाचे फलीत शून्य आले असून याला चळवळ म्हणणाऱ्यांनी बाहेर पडून मुख्य प्रवाहात यावे, यासाठी मी आवाहन करतो, नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी रक्षामंत्रालय सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.
पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली तसेच आदर्श मित्र मंडळ व इतर स्वयंसेवी सामाजिक संस्थांतर्फे सोमवारी अहेरी येथील प्राणहिता पोलीस मुख्यालयात आयोजित ‘अग्निपंख’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मंचावर आदिवासी विकास, वनराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, खा. अशोक नेते, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, सीआरपीएफ ९ व्या बटालियनचे उपकमांडर पवन कुमार, ३४ व्या बटालियनचे द्वितीय कमांडर जितेंद्र कुमार, अहेरीचे उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती, आदर्श मित्रमंडळाचे उदय जगताप, श्रीलक्ष्मीनृसिंह पतसंस्था बल्लारपूरचे श्रीनिवास सुंचुवार, सेवा मित्र मंडळाचे मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना ना. हंसराज अहीर म्हणाले, साधारणत: ३४ वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात डाव्या विचारसरणीच्या नादी लागून अनेक युवक रक्तपात करीत आहेत.
युवकांनी नक्षल चळवळ सोडून समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊन राष्ट्राची सेवा करावी, असे आवाहन त्यांनी केले. गडचिरोलीत नक्षल बिमोडासाठी केंद्र सरकारतर्फे भरीव मदत देण्याची आपली भूमिका आहे. यासाठी रक्षामंत्रालय पूर्ण मदत करेल, तसेच अधिक साधने लागतील तर ती देखील पुरविल्या जातील, आदर्श मित्र मंडळ व इतर सामाजिक संस्थांनी राबविलेला सदर अग्निपंख उपक्रम अनुकरनीय आहे. नक्षल पीडितांच्या कुटुंबाला रोजगार निर्मिती करण्याच्या दृष्टिकोनातून दिलेली मदत अधिक मोलाची आहे. नक्षलवाद ही गडचिरोली जिल्ह्याची असलेली ओळख बदलली पाहिजे. पोलीस दल आपले काम करीत आहे. नागरिकांनीही आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे, असेही ना. अहेरी यावेळी म्हणाले.
सामाजिक कार्याच्या माध्यमातून गडचिरोलीची सकारात्मक ओळख निर्माण करणाऱ्या सामाजिक संस्थांचे कार्य उल्लेखनीय आहे, असे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले. सकारात्मक विचार घेऊन नवी पिढी पुढे येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मुले आता पुण्यासारख्या मोठ्या शहरात शिक्षण घेऊन गडचिरोली जिल्ह्याची नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे आदर्श मित्र मंडळाचे सदस्य उदय जगताप यांनी सांगितले.
याप्रसंगी खा. अशोक नेते, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी महिलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, संचालन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी केले तर आभार पोलीस उपअधीक्षक (गृह) गणेश बिरादार यांनी मानले.
यावेळी बहुसंख्य नागरिक, पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Full cooperation for Naxalism bimaoda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.