गडचिरोली : राज्यातील नाभिक समाजाच्या समस्या मागील ३० वर्षापासून प्रलंबित आहेत. या समाजातील अनेक नागरिक आजही हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यामुळे या समाजाच्या प्रलंबित मागण्या त्वरित सोडवाव्या, या मागणीला घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील नाभिक समाजाच्या बांधवांचा मोर्चा गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. त्यानंतर अनेक प्रलंबित मागण्यांचे निवेदन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले.दिलेल्या निवेदनात नाभिक जातीचा अनुसूचित जातीत समाविष्ट करणे, नाभिक समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे, नाभिक समाज बांधवांना अॅट्रॉसिटी अॅक्टचे संरक्षण देणे, सलुनसाठी व्यावसायिकांना आरक्षीत जागा उपलब्ध करून देणे, सरकारी जागेत सलुन व्यावसायिकांसाठी जागा आरक्षीत करून देणे, गटई कामगार धर्तीवर सलुन व्यावसायिकांना टपरी योजना मंजूर करावी आदी मागण्यांचा समावेश होता. नाभिक समाजातील बांधव आजही हलाखीचे जीवन जगत आहेत. राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात ७ ते ८ हजार मतदार आहेत. शिवाय ५०० ते ६०० सलुन दुकानदार आहेत. नाभिक समाजाचा मेळावा औरंगाबाद येथे मुख्यमंत्री, उपमुख्यंमत्री, समाजकल्याण मंत्र्याच्या उपस्थितीत घेण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नाभिक समाजातील बांधवांचे प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासनही दिले होते. परंतु अजूनपर्यंत नाभिक समाजाच्या समस्या सोडविण्यात आल्या नाही. महाराष्ट्रातील २ लाख सलुन दुकानातून दररोज २० लाखांच्या आसपास गिऱ्हाईक येतात. त्यामुळे नाभिक बांधव एकवटल्यास शासनाला धडा शिकवू शकतात. सरकारने मागील वर्षी दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे नाभिक बांधवांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. त्यामुळे नाभिक समाजातील बांधवांच्या समस्या त्वरित सोडवाव्या, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य होईपर्यंत धरणे आंदोलन चालूच राहिल. त्यामुळे नाभिक समाजाच्या प्रलंबित मागण्या त्वरित मान्य कराव्या, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने करण्यात आली आहे. निवेदन देतांना महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष नामदेवराव शेंडे, सचिव व्यंकटेश कल्याणमवार, जि. प. सदस्य वर्षा कौशिक, संदीप लांजेवार, दिलीप कौशिक, बाळकृष्ण चोपकर, गोविंद नंदपूरकर, राजू बत्तुल्ला, राम लांजेकर, देविदास फुलबांधे, सुनिल फुलबांधे, वसंत सूर्यवंशी, शालू शेंडे यांच्यासह नाभिक समाजबांधव उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
नाभिकांचा मोर्चा धडकला
By admin | Updated: August 21, 2014 23:52 IST