मोफत आणि सवलतीत उपचार! धर्मादाय रुग्णालयांचा गरीबांसाठी आधार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 16:35 IST2025-04-29T16:34:34+5:302025-04-29T16:35:06+5:30
रुग्णालयाबाबत रुग्ण, नातेवाइकांची तक्रार नाही: मार्च महिन्यात ५०० वर रुग्णांवर उपचार

Free and discounted treatment! Charitable hospitals support the poor
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात कार्यरत असलेल्या धर्मादाय रुग्णालयांकडून निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांना योजनेतील तरतुदीनुसार सवलतीच्या दरात खाटा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात दोन धर्मादाय रुग्णालये असून, त्यातील १ रुग्णालय धानोरा तालुक्यात तर १ रुग्णालय अहेरी तालुक्याच्या ग्रामीण भागात कार्यरत आहेत. या दोन्ही धर्मादाय रुग्णालयात अल्पदरात रुग्णांवर उपचार केले जातात.
सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम १९५० मधील कलम ४१ क अन्वये धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब आणि निर्धन रुग्णांसाठी खाटा सवलतीच्या दरात, मोफत राखून ठेवल्या जातात. उच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या योजनेतील तरतुदींचे पालन होते.
राखीव बेडसह असे आहे सवलतीचे प्रमाण
- जिल्ह्यातील दोन धर्मादाय रुग्णालयामध्ये निर्धन आणि गरीब रुग्णांसाठी २० टक्के बेड हे राखीव आहेत. त्यापैकी १० टक्के खाटा निर्धन रुग्णांसाठी मोफत, तर १० टक्के बेड गरीब रुग्णांसाठी ५० टक्के सवलतीच्या दरात आहेत.
- या रुग्णालयात मार्च महिन्यात ५०० वर रुग्णांवर उपचार करण्यात आले. रुग्णांवर उपचारासाठी रुग्णालय प्रशासनाने हजारो रूपये खर्च केले आहेत.
नियम काय सांगतो?
वार्षिक उत्पन्न १ लाख ६० हजार रुपयापर्यंत असलेल्या रुग्णांसाठी १० टक्के खाटा राखीव ठेवणे, ५० टक्के सवलतीच्या दरात उपचारांकरिता खाटा आरक्षित ठेवणे धर्मादाय रुग्णालयांना बंधनकारक आहे. उपचाराबाबत काही अडचण आल्यास संबंधित धर्मादाय निरीक्षक अथवा कार्यालयाशी संपर्क साधून लेखी तक्रार मांडता येते.
येथे मिळते आरोग्यसेवा
धर्मादाय रुग्णालये जिल्ह्यात आहेत. यामध्ये धानोरा तालुक्यातील चातगाव येथे सर्च रुग्णालय आणि अहेरी तालुक्याच्या नागेपल्ली येथील अशिषी सेवासदन धर्मादाय असे दोन रुग्णालय जिल्ह्यात आहेत. येथे सवलतीत उपचार मिळतो.
धर्मादाय रुग्णालयांचे पोर्टल
धर्मादाय रुग्णालयात शासन निर्णयानुसार उपचार केले जात आहेत. उपचार होत नसल्यास तक्रार नोंदविण्यासाठी उपाययोजना म्हणून धर्मादाय आयुक्त यांच्यावतीने एक संयुक्त सॉफ्टवेअरचे पोर्टल तयार केले आहे. त्यामध्ये ज्या रुग्णालयाकडून रुग्णांना उपचार दिले जात नाही, त्यासंबंधी संबंधित रुग्ण त्याच्या नातेवाइकांनी तक्रार केल्यास तत्काळ कारवाई करता येणार आहे.