चार नक्षलवाद्यांना अटक; १८ लाखांचे इनाम, एका महिलेचाही समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2022 18:39 IST2022-04-21T18:39:32+5:302022-04-21T18:39:46+5:30

टीसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलीस जवान गस्तीवर असताना नेलगुंडा येथे काही नक्षलवादी आल्याची माहिती गुप्त माहिती पथकाला मिळाली होती.

Four Naxalites arrested; 18 lakh reward, including a woman | चार नक्षलवाद्यांना अटक; १८ लाखांचे इनाम, एका महिलेचाही समावेश

चार नक्षलवाद्यांना अटक; १८ लाखांचे इनाम, एका महिलेचाही समावेश

गडचिरोली : भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या धोडराज पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील नेलगुंडा येथे साध्या वेशात आणि विनाशस्र आलेल्या चार नक्षलवाद्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यात एका महिला नक्षलीचा समावेश आहे. यातील दोन जहाल नक्षलवाद्यांवर १४ लाखांचे तर उर्वरित दोघांवर ४ लाखांचे बक्षीस शासनाने ठेवले होते. ही कारवाई गुरूवारी पहाटे करण्यात आली.यासंदर्भात पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सायंकाळी पत्रपरिषदेत सविस्तर माहिती दिली.

टीसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलीस जवान गस्तीवर असताना नेलगुंडा येथे काही नक्षलवादी आल्याची माहिती गुप्त माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पाळत ठेवली. दरम्यान पोलीस आल्याची चाहुल लागताच एका घरात साध्या वेशात असलेल्या त्या चार नक्षलवाद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करत त्यांना पकडले. यात बापू उर्फ रामजी दोघे वड्डे (३० वर्ष) रा.नेलगुंडा ता.भामरागड (इनाम ८ लाख), मारोती उर्फ अंतुराम उर्फ माणिक साधू गावडे (३४ वर्ष) रा.कनोली ता.धानोरा (इनाम ६ लाख), बापूची पत्नी सुमन उर्फ जन्नी कोमटी कुड्यामी (इनाम २ लाख) आणि अजित उर्फ भरत (इनाम २ लाख) यांचा समावेश आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) अनुज तारे, एसडीपीओ (भामरागड) नितीन गणापुरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

विविध कारवायांमध्ये सहभाग

जहाल नक्षली बापू वड्डे या कंपनी क्र.१० मध्ये एसीएम (एरिया कमिटी मेंबर) कार्यरत आहे. १४ ऑगस्ट २०२० रोजी पोलीस शिपाई दुशांत नंदेश्वर यांच्या हत्येमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. त्याच्यावर ७ खून, ३ चकमक, १ जाळपोळ आणि २ दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. मारोती गावडे हा गट्टा दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत आहे. तो नक्षल्यांच्या ॲक्शन टिमचा सदस्य असून त्याच्यावर ३ चकमकीचे गुन्हे आहेत. सुमन ही पेरमिली दलमची सदस्य आहे. तिचा ३ खून व ८ चकमकीत सहभाग आहे. १३ एप्रिल २०२२ रोजी गट्टा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील दोन गावच्या दोन निरपराध आदिवासी नागरिकांच्या हत्येत नक्षली मारोती आणि अजित यांचा सक्रिय सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Four Naxalites arrested; 18 lakh reward, including a woman