रानडुकराच्या शिकार प्रकरणी चार आरोपींना अटक
By Admin | Updated: June 24, 2016 01:59 IST2016-06-24T01:59:35+5:302016-06-24T01:59:35+5:30
रानडुकराची शिकार करणाऱ्या मुरखळा माल येथील चार आरोपींना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे

रानडुकराच्या शिकार प्रकरणी चार आरोपींना अटक
वन विभागाची कारवाई : मुरखळा माल येथील घटना; गुप्त माहितीवरून रचला सापळा
चामोर्शी : रानडुकराची शिकार करणाऱ्या मुरखळा माल येथील चार आरोपींना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. सदर कारवाई २२ जून रोजी मुरखळा माल येथे करण्यात आली.
दिवाकर भाऊजी भोयर, चरणदास पांडुरंग भोयर, गुणाजी नागा भोयर, महारू मंगरू सरपे सर्व रा. मुरखळा माल अशी आरोपींची नावे आहेत. मुरखळा माल परिसरात रानडुकराची शिकार करण्यात आली असल्याची गुप्त माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली. त्यानुसार चामोर्शीचे वन परिक्षेत्राधिकारी के. आर. धोंडणे यांच्या निर्देशानुसार चामोर्शी बिटाचे क्षेत्र सहायक आर. डी. टोकला, वनरक्षक सुप्रीया गळमळे, विशेष सेवा वनरक्षक माधुरी वट्टी, वनमजूर मारोती गुरनुले यांनी मुरखळा माल शेतशिवारात शोधमोहीम सुरू केली. गावाच्या अलिकडेच दुचाकी ठेवून तलावाच्या दिशेने गेले असता, तलावाच्या वरच्या बाजुला संतोष विठ्ठल केळझरकर यांच्या मालकीच्या शेतात शिकार केलेले मृत रानडुकर कावडीने आणण्यात आले होते. ते कापण्याची तयारी आरोपींनी सुरू केली होती. तेवढ्यात वनकर्मचारी घटनास्थळावर पोहोचले व सर्व आरोपींना अटक केली. मुरखळा मालचे सरपंच पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत मोका पंचनामा केला. चामोर्शी येथे रानडुक्कर आणून त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. सदर प्रकरणात चारही आरोपींविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे ९, ३९ व ५१ नुसार वनगुन्हा दाखल केला. चारही आरोपींना चामोर्शी न्यायालयात हजर करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)