वणव्यामुळे वनसंपत्ती धोक्यात
By Admin | Updated: April 4, 2015 00:46 IST2015-04-04T00:46:21+5:302015-04-04T00:46:21+5:30
उन्हाळ्याच्या दिवसात जंगलांना अचानक आग लागते. तर काही ठिकाणी नागरिक जंगलाला आग लावतात, असे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

वणव्यामुळे वनसंपत्ती धोक्यात
येलचिल जंगलात आग : वन विभागाचे दुर्लक्ष
एटापल्ली : उन्हाळ्याच्या दिवसात जंगलांना अचानक आग लागते. तर काही ठिकाणी नागरिक जंगलाला आग लावतात, असे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आगीमुळे प्रत्येक वर्षी जिल्ह्यातील शेकडो हेक्टर जंगल आगीच्या भक्षस्थानी सापडतो. परिणामी करोडो रूपयांची वनसंपत्ती जळून खाक होत असते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास आलापल्ली वन विभागातील आलापल्ली-एटापल्ली मार्गालगत येलचिल जंगल परिसरात आग लागली. मात्र सदर आग विझविण्यासाठी वन विभागाचे एकही कर्मचारी घटनास्थळी हजर झाले नसल्याची माहिती आहे.
आलापल्ली, सिरोंचा, भामरागड, वडसा व गडचिरोली आदी पाच वन विभाग आहेत. या पाचही वन विभागात सागवानसह इतर मौल्यवान झाडे आहेत. वणव्यावर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी संपूर्ण साहित्यासह वन विभाग दक्ष असल्याचा दावा वनाधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र आलापल्ली वन विभागातील दुर्गम येलचिल जंगल परिसरात लागलेल्या वणव्याकडे वनाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
जनजागृतीचा अभाव
आलापल्ली वन विभागात दुर्गम व अतिदुर्गम भागात वणव्याबाबतच्या जनजागृतीचा अभाव असल्याचे चित्र आहे. तेंदूपत्ता संकलन व मोहफूल वेचण्याच्या कामासाठी गाव परिसरातील काही नागरिक जंगलांना आग लावत असल्याचे दिसून येते. मात्र दुर्गम व अतिदुर्गम भागातील आग लागलीच आटोक्यात आणण्यास वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे या निमित्याने दिसून येते.