सिरोंचातील नदी मार्गाच्या वन गस्ती थंडावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:00 IST2020-07-27T05:00:00+5:302020-07-27T05:00:47+5:30

सिरोंचा तालुका मुख्यालयी वन विभागाचे उपवनसंरक्षक कार्यालय आहे. या कार्यालयांतर्गत सहा वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. संपूर्ण तालुका नदी किनारपट्टीला लागून असल्याने सागवान तस्करांना सागवानची तस्करी करणे नदी मार्गे सोपे आहे. नदी मार्गातील सागवान तस्करी रोखण्यासाठी वन विभागाने १५ लाख रुपयांच्या खर्चातून १५ बोटी खरेदी केल्या.

Forest patrols along the river in Sironcha have cooled | सिरोंचातील नदी मार्गाच्या वन गस्ती थंडावल्या

सिरोंचातील नदी मार्गाच्या वन गस्ती थंडावल्या

ठळक मुद्देसागवान तस्करांना रान मोकळे : कोट्यवधी रुपयांची होताहे तस्करी

कौसर खान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात सीमेवर तेलंगणा राज्याला लागून असलेल्या नक्षलप्रभावित सिरोंचा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सागवान तस्करी वाढली आहे. ही सागवान तस्करी रोखण्यासाठी वन विभागातर्फे कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र ही कारवाई मार्गामार्गावर केली जात आहे. नदी मार्ग तसेच पात्राच्या परिसरात करण्यात येणाऱ्या गस्ती आता थंडावल्या आहेत. परिणामी कोट्यवधी रुपयातून खरेदी करण्यात आलेल्या वन विभागाच्या बोटी निधीअभावी तशाच पडून आहेत.
सिरोंचा तालुका मुख्यालयी वन विभागाचे उपवनसंरक्षक कार्यालय आहे. या कार्यालयांतर्गत सहा वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. संपूर्ण तालुका नदी किनारपट्टीला लागून असल्याने सागवान तस्करांना सागवानची तस्करी करणे नदी मार्गे सोपे आहे. नदी मार्गातील सागवान तस्करी रोखण्यासाठी वन विभागाने १५ लाख रुपयांच्या खर्चातून १५ बोटी खरेदी केल्या. प्रत्येक वन परिक्षेत्र कार्यालयाला बोटी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात बोटीच्या सहाय्याने गस्त लावणे, नदीत वाहून जाणारे मौल्यवान सागवान लाकूड शोधून काढणे आदी कामे वन विभागातर्फे केली जात होती. मात्र यंदाच्या पावसाळ्यात वन विभागाच्या या बोटी सिरोंचा येथील वन परिक्षेत्र कार्यालयात तशाच पडून असून शोभेच्या वस्तू बनल्या आहेत.
सिरोंचा तालुका हा तेलंगणा राज्याला लागून असून झिंगानूर, पातागुडम, आसरअल्ली, चिटूर, देचलीपेठा आदी परिसरात मोठ्या प्रमाणात सागवानाची झाडे तोडून नदी मार्गे याची तस्करी तेलंगणा राज्यात केली जात असते. कोरोना संचारबंदीच्या काळात वन विभागाची नदी मार्गावरील गस्त पूर्णत: बंद झाली आहे. त्यामुळे सागवान तस्करांना चोरीसाठी रान मोकळे झाले आहे. वन विभागाच्या या बोटीवरील अनुभव असलेले चालक व मजुरांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. बोटीचे चालक व मजुरांना पुन्हा कामावर घेऊन नदी मार्ग व नदी पात्रातील गस्त सुरू करावी, अशी मागणी वन्यप्रेमींनी वन विभागाकडे केली आहे.

तराफ्यातून तेलंगणात सागवान तस्करी
सिरोंचा तालुक्यातील मौल्यवान सागवान लठ्याची तस्करी करून ते तेलंगणा राज्यात छुप्या मार्गाने नेले जात आहे. या परिसरातील तस्कर जंगलातील सागवान लठ्ठे एकत्र करून तराफा बांधून नदी पात्रात सोडतात. दोरीच्या सहाय्याने हा तराफा तेलंगणा राज्याच्या दिशेने ओढतात. अशावेळी बोटीच्या सहाय्याने वनाधिकाऱ्यांना वेळेवर त्या ठिकाणी पोहोचून तस्करांवर कारवाई करणे सोपे होते. मात्र बोटी कुचकामी ठरल्याने वन विभागाची गस्त व कारवाया थंडावल्या आहेत. शासनाच्या वतीने सदर बोटी खरेदी करण्यासाठी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र त्याचा उपयोग होताना आता दिसून येत नाही.

सिरोंचा वन परिक्षेत्र कार्यालयांतर्गत तीन कोटी उपलब्ध आहेत. मात्र मनुष्यबळ व निधीचा अभाव असल्याने वनतस्कराविरोधात कारवाई करण्यासाठी या बोटीचा वापर करणे कठीण होत आहे. याच कारणामुळे मागील काही महिन्यांपासून या बोटी कार्यालयाच्या परिसरात उभ्या आहेत.
- विनायक नरखेडकर,
वन परिक्षेत्राधिकारी सिरोंचा

Web Title: Forest patrols along the river in Sironcha have cooled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.