वनजमिनीचे रूपांतर होतेय शेतजमिनीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:00 IST2020-05-28T05:00:00+5:302020-05-28T05:00:58+5:30
आलापल्ली वनविभागाअंतर्गत पेरमिली वनपरिक्षेत्राच्या हद्दीत बुर्गी गाव येते. या गावालगत रस्त्याच्या बाजूला वनजमिनीवरील झाडे तोडून भरदिवसा ट्रॅक्टरच्या सहाय्याने सपाटीकरण करून अतिक्रमण केले जात आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष हा प्रकार पाहिल्यानंतर जेसीबीचालक जेसीबी घेऊन पसार झाला.

वनजमिनीचे रूपांतर होतेय शेतजमिनीत
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : वनविभागातील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे एटापल्ली तालुक्यातील वनजमिनीचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. बुर्गी गावाजवळ उडेरा-बुर्गी मार्गालगत जंगलातील झाडे तोडून तेथे शेतजमिनीसाठी सपाटीकरण केले जात आहे. अवैधरित्या सुरू असलेल्या या अतिक्रमणाबाबत मात्र वनकर्मचारी अनभिज्ञ असल्याचे दिसून येते.
आलापल्ली वनविभागाअंतर्गत पेरमिली वनपरिक्षेत्राच्या हद्दीत बुर्गी गाव येते. या गावालगत रस्त्याच्या बाजूला वनजमिनीवरील झाडे तोडून भरदिवसा ट्रॅक्टरच्या सहाय्याने सपाटीकरण करून अतिक्रमण केले जात आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष हा प्रकार पाहिल्यानंतर जेसीबीचालक जेसीबी घेऊन पसार झाला. सदर अतिक्रमणाबाबतची माहिती प्रस्तूत प्रतिनिधीने या क्षेत्राचे वनपाल व वनरक्षकांना दिली असता, याबाबत आपल्याला कुठलीही माहिती नाही, असे त्या वनकर्मचाऱ्याने सांगितले.
एटापल्ली तालुक्यात दरवर्षी शेकडो हेक्टर वनजमिनीवरील झाडे सर्रास तोडून त्यावर शेतजमीन तयार केली जाते. काही नागरिक घराचे बांधकाम करतात. अशा प्रकारे अवैध अतिक्रमण वाढत असल्याने वनजमिनीचे व जंगलाचे क्षेत्र कमी होत आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.