सिरोंचा : शासनाच्या राष्ट्रीय शालेय पोषण योजनेंतर्गत दुपारचे भोजन बनविणाऱ्या शालेय पोषण कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन गुरूवारी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चाद्वारे धडक देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद शाळा कोत्तागुडम येथून मोर्चाला सुरूवात करण्यात आली. या मोर्चाचे नेतृत्व जिल्हा संघटक विनोद झोडगे, तालुका संघटक किशोर मडावी, तालुकाध्यक्ष मंदा कोथावडला, तालुका सचिव गिता दासरी, तालुका उपाध्यक्ष संतोष आटेटी यांनी केले. यावेळी संवर्ग विकास अधिकारी चारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात २६ फेब्रुवारी २०१४ च्या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावून आतापर्यंत ज्या-ज्या शाळेत व्यवस्थापन समित्यांनी बचत गट निवडण्याची कार्यवाही केली आहे. ती कार्यवाही रद्द करण्याचे तत्काळ आदेश देऊन १० जुलै २०१४ च्या सुधारित परिपत्रकानुसार कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर परत घेण्यात यावे, तसेच जि. प. शाळा नगरम येथील सुनिता समय्या ओल्लाला यांना कामावर घेण्यात यावे, आसरअल्ली केंद्रातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्याचे आॅक्टोंबर २०१३ पासून व इतर केंद्रातील कर्मचाऱ्यांचे मार्च २०१४ पासून थकीत मानधन त्वरित देण्यात यावे, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना चपराशी कम कूक पदावर नियुक्त करण्यात यावे, तसेच कर्मचाऱ्यांना ठरलेले मानधन दर महिन्याला देण्यात यावे, त्यांना किमान १० हजार रूपये वेतन देण्यात यावे, शालेय पोषण आहार सामग्री उपलब्ध नसल्यास कर्मचाऱ्यास जबाबदार धरू नये, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे. बीडीओंनी निवेदन स्वीकारले. (तालुका प्रतिनिधी)
आहार कर्मचाऱ्याची पं. स. वर धडक
By admin | Updated: August 23, 2014 01:48 IST