शेताच्या बांधावरील लोकगीतांचे स्वर झाले लुप्त
By Admin | Updated: August 29, 2015 00:05 IST2015-08-29T00:05:57+5:302015-08-29T00:05:57+5:30
लोकगीताच्या ओळीतून परमेश्वराची आवळणी करीत मातीत खपणाऱ्या श्रमिकाला आपण काळ्या मायेची किती सेवा केली, याचे भान नसायचे.....

शेताच्या बांधावरील लोकगीतांचे स्वर झाले लुप्त
ग्रामीण साज हरविला : बदलत्या काळाचा परिणाम
प्रदीप बोडणे वैरागड
भल्ला रोवणा रोवलो..
मार्र्कंडेश्वरा तुझ्या नावाभूई
कालेश्वरा तुझ्या नावाभूई
मंडारेश्वरा तुझ्या नावाभूई
अशा प्रकारे लोकगीताच्या ओळीतून परमेश्वराची आवळणी करीत मातीत खपणाऱ्या श्रमिकाला आपण काळ्या मायेची किती सेवा केली, याचे भान नसायचे. वरूण राजाची कृपा झाली अन् पूर्व विदर्भातील भातपट्ट्यात रोवणीला सुरूवात झाली की ओळीने भात पिकाची लागवड करणाऱ्या महिलांच्या तोंडून लोकगीताचे स्वर बाहेर पडणार नाही, असे कसे होणार! ‘इतका रोवणा रोवलो माये तुझ्या सायभूई...’ हे शेताच्या बांधातून येणारे लोकगीताचे स्वर लुप्त झाले आहे.
आधुनिकतेच्या नावाखाली आता ग्रामीण जीवनाचा खराखुरा साज हरविला आहे.
चंदनगडचा राजा चंदन
राणी त्याची आमाबाई
कन्या त्याची आबीलबाई
नईचा नांदते राजा चंदन
या लोकगीताच्या स्वरात एखाद्या पौराणिक, काल्पनिक अलिखीत विषय असायचा. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेले हे लोकगीत एका ज्ञात असलेल्या जाणकार महिलेने प्रथम म्हणायचे आणि इतरांनी त्याला सूस्वर साथ द्यायची आणि मग माथ्यावर आलेला सूर्य कधी मावळतेला गेला, याचे भान नसायचे. आपण आपले श्रम परमेश्वरा तुझ्या चरणी वाहतो, असा त्या मागचा भाग असायचा. मात्र आता प्रगतीच्या आधुनिक काळात व्यवहाराचा भाग अधिक आहे. आता घड्याळीच्या काट्यावर व मोबाईलच्या आकड्यावर श्रमाचे मोजमाप होते. अलिकडे शेतीचे यांत्रिकीकरण झाल्याने रोवणीच्या ओळ्या आता कालबाह्य होत आहे.