पूर ओसरला पण शेतीची स्थिती भयानक; शेकडो हेक्टरातले पीक करपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 13:42 IST2020-09-02T13:42:01+5:302020-09-02T13:42:43+5:30
शेतात पुराचे पाणी तब्बल तीन-चार दिवस साचून राहिल्याने कापसाच्या पिकासह धानाच्या पिकाचेही अतोनात नुकसान झाले आहे.

पूर ओसरला पण शेतीची स्थिती भयानक; शेकडो हेक्टरातले पीक करपले
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: जिल्ह्यातील पूर ओसरला असला तरी, शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी सरलेले नाही. शेतात पुराचे पाणी तब्बल तीन-चार दिवस साचून राहिल्याने कापसाच्या पिकासह धानाच्या पिकाचेही अतोनात नुकसान झाले आहे.
भेंडाळा परिसरात असलेल्या दोठकुली, वाघोली, एकोडी, घारगाव, फोकुर्डी, काण्होली या परिसरात असलेल्या जवळपास शेकडो हेक्टर धानशेत, तसेच कापसाची शेतीपूर्णत: करपून गेल्याची विदारक स्थिती आहे.
अगोदरच शेतकरी हंगामामधे इथून तिथून उसनवारी करीत तसेच बँकेतून पैसे जमा करून शेतीला लावीत असतो. पण यंदा या शेतकऱ्याच्या वाट्याला शेती नाही तर माती हातात मिळाली असल्याची स्थिती या परिसरात निर्माण झाली आहे. आतातरी मायबाप शासन या पूरग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर झालेल्या नुकसानीची एकरी २५ हजार रुपयाची भरपाई मिळावी अशी केविलवाणी विनवणी या शेतकऱ्यांनी केली आहे.