पुरामुळे चार मार्गावरील वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:00 IST2020-08-24T05:00:00+5:302020-08-24T05:00:58+5:30
भामरागड गावातील पाणी तब्बल पाच दिवसानंतर कमी झाले. दुकानदारांनी दुकानांची साफसफाई करण्यास सुरूवात केली आहे. पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी सुध्दा कमी झाली असल्याने हा मार्ग सुरू झाला आहे. मात्र मार्गावर मोठ्या प्रमाणात गाळ साचले आहे. यातून मार्ग काढताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नगर पंचायत तसेच खासगी नागरिक साफसफाई करीत आहेत.

पुरामुळे चार मार्गावरील वाहतूक ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली/भामरागड : पुरामुळे आसरअल्ली-सोमनपल्ली, हेमलकसा-सुरजागड, कसनसूर-भामरागड, अहेरी-बेजुरपल्ली-व्यंकटापूर हे चार मार्ग बंद आहेत. गडचिरोली, आरमोरी मार्गावरील पाल नदीच्या पुलावर पाणी चढल्याने शनिवारी या मार्गावरची वाहतूक बंद होती. मात्र रविवारी पूर ओसरल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे.
भामरागड गावातील पाणी तब्बल पाच दिवसानंतर कमी झाले. दुकानदारांनी दुकानांची साफसफाई करण्यास सुरूवात केली आहे. पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी सुध्दा कमी झाली असल्याने हा मार्ग सुरू झाला आहे. मात्र मार्गावर मोठ्या प्रमाणात गाळ साचले आहे. यातून मार्ग काढताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नगर पंचायत तसेच खासगी नागरिक साफसफाई करीत आहेत. आष्टी-गोंडपिपरी हा मार्ग रविवारी सकाळपासूनच सुरू झाला.
गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडले असल्याने वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे तिच्या उपनद्या असलेल्या कठाणी, खोब्रागडी, पाल, शिवणी नाला आदींना दाब निर्माण झाली आहे. तसेच प्राणहिता, गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी सुध्दा वाढली आहे. सिरोंचा तालुक्यात मरपल्ली नाल्यात मागील पाच दिवसांपासून एक जड वाहन अडकले आहे.
भाकरोंडी परिसराला फटका
भाकरोंडी : आरमोरी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भाकरोंडी परिसरालाही पुराचा फटका बसला. खोब्रागडी नदीला पूर आल्याने पिसेवडधा ते भाकरोंडी हा मार्ग २० ऑगस्टपासून दोन दिवस बंद होता. या परिसरातील अनेक नाल्यांवरील पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे पावसाळ्यात वाहतूक खंडीत होते.