पूरपीडितांना डावलले; यादीत बोगस लाभार्थ्यांची नावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 16:23 IST2025-01-10T16:22:15+5:302025-01-10T16:23:11+5:30
शेतकऱ्यांचा आरोप: उराडी गावातील प्रकार

Flood victims ignored; names of bogus beneficiaries in the list
लोकमत न्यूज नेटवर्क
जोगीसाखरा : कुरखेडा तालुक्याच्या उराडी येथील तलाठी कार्यालयाकडून प्रसिद्ध झालेल्या पूरबुडीच्या यादीत बोगस लाभार्थ्यांची नावे आहेत, असा आरोप उराडी येथील शेतकऱ्यांनी केला आहे.
कुरखेडा तालुक्यातील उराडी सजा क्रमांक ८ अंतर्गत नदी व नाल्याच्या जवळ शेती असलेल्या शेतकऱ्यांचे जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये पीक पुरामुळे नष्ट झाले होते. यात रोवणी केलेल्या पिकाचाही समावेश होता. बहुतांश शेतकऱ्यांची शेती पडीक राहिली. या शेतककऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांना दुप्पट भरपाई देणे गरजेचे होते; परंतु या शेतकऱ्यांना डावलून ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरत नाही, अशा शेतकऱ्यांना पीक नुकसानीची मदत दिली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांची पिके पुराच्या पाण्यात नष्ट झाली. त्यांची नावे यादीत नाहीत. या प्रकरणात मोठा घोळ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी केला, असा आरोप वंचित शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत बाजू जाणून घेण्यासाठी उराडीचे ग्रामपंचायत अधिकारी स. ग. शेडमाके यांच्याशी संपर्क झाला नाही.
मर्जीतील लोकांना फायदा पोहोचविल्याचा आरोप
अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे सव्र्व्हे करताना ग्रामपंचायत अधिकारी व सदस्यांनी आपल्या मर्जीतील लोकांचीच नावे यादीत समाविष्ट केली. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना डावलण्यात आले, असा आरोप ग्रामसभा समिती अध्यक्ष मोतिराम नाहामुर्ते, गणपत चौधरी, साहिल वैरागडे, अतुल चौधरी, कार्तिक दडमल, पिंटू दडमल यांनी केला आहे