जिल्ह्यात पूरपरिस्थिती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:01 IST2020-08-18T05:00:00+5:302020-08-18T05:01:47+5:30

पावसाचा जोर ओसरल्याने तसेच इंद्रावती नदीच्या पाण्याची पातळी काही प्रमाणात कमी झाल्याने पर्लकोटाची पाणीपातळी कमी झाली. त्यामुळे भामरागडातील पुराचे पाणी ओसरले आहे. त्यामुळे भामरागडातील जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. मात्र पर्लकोटा नदीच्या पुलावरून जवळपास तीन फूट पाणी कायम आहे. त्यामुळे भामरागडसह तालुक्यातील इतर काही गावांचा संपर्क तुटला आहे.

Flood situation persists in the district | जिल्ह्यात पूरपरिस्थिती कायम

जिल्ह्यात पूरपरिस्थिती कायम

ठळक मुद्देअनेक मार्ग अजूनही बंद : गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती नद्यांना उधान

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा/भामरागड : सोमवारी पावसाचा जोर ओसरल्याने नद्यांची पाणीपातळी घटली आहे. मात्र सिरोंचा व भामरागड या दोन्ही तालुक्यातील काही मार्ग बंदच आहेत. तसेच पूरपरिस्थिती कायम आहे.
भामरागड - भामरागड गावात १५ ऑगस्ट रोजी पर्लकोटा नदीचे पाणी शिरले होते. रविवारी पाणी कायम होते. पावसाचा जोर ओसरल्याने तसेच इंद्रावती नदीच्या पाण्याची पातळी काही प्रमाणात कमी झाल्याने पर्लकोटाची पाणीपातळी कमी झाली. त्यामुळे भामरागडातील पुराचे पाणी ओसरले आहे. त्यामुळे भामरागडातील जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. मात्र पर्लकोटा नदीच्या पुलावरून जवळपास तीन फूट पाणी कायम आहे. त्यामुळे भामरागडसह तालुक्यातील इतर काही गावांचा संपर्क तुटला आहे.
गोसेखुर्द धरणाचे १३ दरवाजे ५० मीटरने उचलण्यात आले आहेत. वैनगंगा नदीची पाणीपातळी आष्टी केंद्रावरील नोंदीनुसार सामान्य असून इशारापातळीच्या खाली आहे. वर्धा नदीची शिरपूर केंद्रावरील नोंदीनुसार पाणीपातळी सामान्य आहे. पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे प्राणहिता नदीची पाणीपातळी महागाव व टेकरा केंद्रावर वाढली असल्याचे दिसून आले आहे. मात्र इशारा पातळीच्या खाली आहे. गोदावरी नदीवरील मेडिगड्डा बॅरेजचे ६५ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीतून पाण्याचा विसर्ग वाढला असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
छत्तीसगड राज्यातील बिजापूर, दंतेवाडा जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने इंद्रावती नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. पातागुडम केंद्रावरील नोंदीनुसार ही पाणीपातळी इशारा पातळीच्या खाली आहे. जगदलपूर, चिंदनार व तूमनार येथे नदीची पाणीपातळी वाढत असल्याने इंद्रावती नदीची पाणीपातळी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
इंद्रावती नदीच्या बॅक वॉटरमुळे भामरागड केंद्रावर वाढली आहे. सोमवारी दुपारी ३.३० वाजता घेतलेल्या नोंदीनुसार पुलावरून जवळपास अर्धा मीटर पाणी आहे.

पाच मार्ग बंद
आलापल्ली-भामरागड मार्ग पर्लकोटा नदीमुळे बंद आहे. आसरअल्ली-सोमनपल्ली मार्गावरील सोमनपल्ली नाल्यावर पाणी आहे. रोमपल्ली-झिंगानूरदरम्यान कोरेतोगू नाल्यावर पाणी आहे. हेमलकसा-करमपल्ली-सुरजागड मार्गावरील पिडमिली नाल्यावर पाणी आहे. कसनसूर-कोठी-भामरागड-कवंठे मार्गावरील आरेवाडा नाल्यावर पाणी आहे. त्यामुळे हा मार्ग बंद आहे. मंगळवारी पाणी ओसरून मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे.

अटीवागू नाल्यावरील पूल वाहून गेला
सिरोंचा : सिरोंचा ते टेकडातालादरम्यान असलेल्या अटीवागू नाल्यावरील अर्धा पूल वाहून गेला. त्यामुळे आवागमनास अडचण निर्माण होत आहे. सिरोंचा तालुक्यात मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती, प्राणहिता व गोदावरी नद्या ओसंडून वाहात आहेत. लहान नदी व नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. टेकडाताला ते सिरोंचादरम्यान अटीवागू नाला आहे. या नाल्याच्या पुलावरून मागील दोन दिवसांपासून पाणी वाहत होते. पाण्यामुळे पुलावरील स्लॅब वाहून गेला आहे. या पुलावरून आता जड वाहन नेणे अशक्य होणार आहे. विशेष म्हणजे पुलावरील स्लॅब वाहून गेला असल्याने या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे स्पष्ट होत आहे. नागरिकांनी श्रमदानातून तात्पुरत्या स्वरूपात माती टाकून पुलाची डागडुजी करण्याचा प्रयत्न केला. बांधकाम विभागाचे विभागीय अभियंता योगराज मसे यांनी पुलाला भेट दिली. काँग्रेसचे नेते तिरूपती इंदुरी यांनी पूल बांधकामाचे अंदाजपत्रक बनविण्याची मागणी अभियंता मसे यांच्याकडे केली. राकाँचे रामकिटू नीलम, सत्यम पिडगू, अशोक पेद्दी, राजेश्याम कासेटी, राकेश अंबिलपू, महेश आरे, मुतय्या नरवेटी, व्यंकटेश पुप्पाला, व्यंकस्वामी नीलम, गणेश इंदुरी, प्रवीण इंदुरी, राजबापू आरे, कृष्णा नीलम, नागेश इंदुरी, जंगा सुरेश, रोहित नीलम यांनी श्रमदान केले.

Web Title: Flood situation persists in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस