पाच हजार बालके आढळली कुपोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 01:05 IST2018-02-14T01:05:19+5:302018-02-14T01:05:33+5:30
आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत जिल्हाभरात ४ हजार ८८० बालके कुपोषित आढळून आली आहेत. त्यामध्ये ९५८ बालके अतिकुपोषित तर ३ हजार ९२२ बालके मध्यम कुपोषित आढळून आले आहेत.

पाच हजार बालके आढळली कुपोषित
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत जिल्हाभरात ४ हजार ८८० बालके कुपोषित आढळून आली आहेत. त्यामध्ये ९५८ बालके अतिकुपोषित तर ३ हजार ९२२ बालके मध्यम कुपोषित आढळून आले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात शून्य ते पाच या वयोगटात सुमारे ७९ हजार ९५० बालके आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार प्रत्येक बालकाची वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जाते. बालकांचे कुपोषण ही गंभीर समस्या असल्याने कुपोषण दूर करण्यासाठी आरोग्य व बाल कल्याण विभागाच्या मार्फत विविध उपाययोजना योजल्या जातात. मात्र अजूनही पूर्णपणे कुपोषणमुक्तीतून सुटका मिळाली नाही. आरोग्य व बालकल्याण विभागाच्या मार्फत महिला गरोदर असल्यापासून पोषणाबाबत योग्य मार्गदर्शन केले जाते. त्यांना पोषण आहार उपलब्ध करून दिला जातो. त्याचबरोबर वेळोवेळी औषधेही उपलब्ध करून दिली जातात. मात्र दुर्गम भागातील काही महिला व बालकांना या सर्व सोयीसुविधांचा लाभ मिळत नाही. त्याचबरोबर त्या निरक्षर असल्याने स्वत:ची व बालकाच्या आरोग्याची योग्य पद्धतीने काळजी घेत नाही, परिणामी अजूनही जिल्ह्यात कुपोषणाची समस्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अतिशय गंभीर आहे. एकूण बालकांच्या सुमारे ६.१९ बालके अजूनही कुपोषणाच्या विळख्यात सापडले आहेत. मात्र आरोग्य विभागाच्या योजनांमुळे कुपोषणाची समस्या काही प्रमाणात कमी झाली आहे.
तालुकानिहाय कुपोषित बालकांची संख्या
अहेरी तालुक्यात २७१ बालके मध्यम कुपोषित, ८४ बालके अतिकुपोषित, आरमोरी तालुक्यात २०४ मध्यम कुपोषित, २९ अतिकुपोषित, भामरागड तालुक्यात ३८८ मध्यम कुपोषित, ९५ अतिकुपोषित, चामोर्शी तालुक्यात ४८५ बालके मध्यम कुपोषित, १०१ अतिकुपोषित, देसाईगंज तालुक्यात ४३८ मध्यम कुपोषित, ७९ अतिकुपोषित, धानोरात ४०२ मध्यम कुपोषित, १०४ अतिकुपोषित, एटापल्लीत ४७७ मध्यम कुपोषित, १६१ अतिकुपोषित, गडचिरोलीत ४१९ मध्यम कुपोषित, ६८ अतिकुपोषित, कोरचीत २८८, कुरखेडात २६३, मुलचेरा २२०, सिरोंचा २९४ बालके कुपोषित आढळले आहेत.