कोरोना काळात मत्स्यपालन संस्था संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:34 IST2021-05-15T04:34:49+5:302021-05-15T04:34:49+5:30
वैरागड मच्छीपालन सहकारी संस्थाअंतर्गत महादेव तलाव, आरकबोडी, माराईबोडी, अगड, गादबोडी या तलावात मत्स्यबीज टाकून व त्याचे पालन करून योग्य ...

कोरोना काळात मत्स्यपालन संस्था संकटात
वैरागड मच्छीपालन सहकारी संस्थाअंतर्गत महादेव तलाव, आरकबोडी, माराईबोडी, अगड, गादबोडी या तलावात मत्स्यबीज टाकून व त्याचे पालन करून योग्य वाढ झाल्यानंतर संस्थेचे सदस्य सामूहिकरीत्या मासे पकडून त्याची विक्री करतात. याच नफ्यातून संस्थांचा आर्थिक व्यवहार चालतो. साधारण संस्था तीळसंक्रांतीच्या सणानंतर १५ ते २० दिवसांच्या अंतराने मासे विक्रीसाठी पकडतात. ३१ जूनपर्यंत मासेमारी चालते. मात्र, या वर्षात १५ एप्रिलपासून मासेमारी बंद असल्याने मत्स्यपालन संस्था आर्थिक डबघाईस आल्या आहेत.
वैरागड मच्छी पालन सहकारी संस्थेत १७२ सदस्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मागील काही वर्षांत अपुरा पाऊस पडल्याने मत्स्य पालन संस्था सतत आर्थिक तोट्यात आहेत. यंदा तलावात जलसाठा भरपूर असला तरी मासेमारी न झाल्याने मत्स्यपालन संस्था आर्थिक संकटात आहेत. कोरोना संसर्गात २५ पेक्षा अधिक संस्थेचे सदस्य एकत्र येऊन मासेमारी करण्यास तयार नसून कमी लोकांत मासेमारी करणे अशक्य आहे. संस्थेच्या अनेक तलावातील मत्स्यबीज तसेच पडून आहेत. मे महिन्यात जलसाठा कमी होत असल्याने मासे नष्ट होत आहेत.
कोट :
सन २००६ च्या वन हक्कामुळे वैरागड संस्थेकडे असणारे विहीरगाव, करपडा, मेंढा येथील तलाव संस्थेकडून काढून घेण्यात आले. त्यामुळे संस्थेचा महसूल बुडाला. या वर्षात पूर्ण संकटामुळे संस्था आर्थिक डबघाईस आल्या आहेत. त्यामुळे सरकारने जिल्ह्यातील मत्स्यपालन सहकारी संस्थांना आर्थिक मदत करावी.
रोहिदास दुमाने,
अध्यक्ष,
मच्छीपालन सहकारी संस्था वैरागड.