जाळाला मासा अडकला; मात्र युवक बुडाला
By दिगांबर जवादे | Updated: February 19, 2024 22:01 IST2024-02-19T22:00:44+5:302024-02-19T22:01:19+5:30
साेनसरी गावाच्या शेतशिवारात तलाव आहे.

जाळाला मासा अडकला; मात्र युवक बुडाला
दिगांबर जवादे, गडचिराेली : मासे पकडण्यासाठी तलावात टाकलेल्या जाळाला मासा अडकला. मात्र, जाळ उचलण्यासाठी गेलेला युवक पाण्यात बुडाल्याची घटना साेमवारी सायंकाळच्या सुमारास कुरखेडा तालुका मुख्यालयापासून १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनसरी गावात घडली. पवन शिवलाल कोडाप (२८, रा. साेनसरी), असे तलावात बुडालेल्या युवकाचे नाव आहे.
साेनसरी गावाच्या शेतशिवारात तलाव आहे. या तलावात पवन काेडाप व शुभम कवडो या युवकांनी मासे पकडण्यासाठी जाळे टाकले हाेते. सायंकाळच्या सुमारास दाेघेही जाळे उचलण्यासाठी तलावाच्या पाण्यात उतरले. मात्र, पवनची अचानक प्रकृती बिघडल्याने ताे पाण्यात पाेहू शकला नाही. ताे एकदम पाण्यात बुडाला. साेबत असलेल्या शुभमने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आले नाही. शुभमने घडलेली घटना गावात जाऊन सांगितली. गावकऱ्यांनी तलावात पवनचा शाेध घेतला, मात्र ताे आढळून आला नाही. मात्र, जाे जाळ काढण्यासाठी पवन तलावात उतरला त्या जाळाला एक मासा अडकला हाेता. साेमवारी सायंकाळी अंधार पडल्याने शाेधमाेहीम थांबवण्यात आली आहे. पुन्हा मंगळवारी शाेधमाेहीम राबवली जाईल, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.