आधी वाघाशी झुंज, नंतर ग्रामस्थांवर हल्ला; चाैघांना जखमी करणारा बिबट मृतावस्थेत
By गेापाल लाजुरकर | Updated: March 25, 2026 20:19 IST2026-03-25T20:18:39+5:302026-03-25T20:19:38+5:30
पोर्ला वनपरिक्षेत्राच्या चांभार्डातील थरार : वनविभागाची टीम पोहोचण्यापूर्वीच झाला ‘हिंस्त्रा’चा अंत

First a fight with a tiger, then an attack on villagers; The leopard that injured four people is dead
गडचिरोली : पोर्ला वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चांभार्डा ते मरेगाव पाणंद रस्त्यावरील एका शेताजवळ बुधवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास बिबट्याने धुमाकूळ घातला. वाघासोबत आधीच झालेल्या झुंजीत गंभीर जखमी अवस्थेतील या बिबट्याने रस्त्याने जाणाऱ्या चार व्यक्तींवर हल्ला करून त्यांना जखमी केले. मात्र, वनविभागाची ‘आरआरटी’ टीम घटनास्थळी पोहोचून त्याला जेरबंद करण्यापूर्वीच या बिबट्याचा मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, २५ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास चांभार्डा येथील हरिदास मुनघाटे यांच्या शेताजवळ एक जखमी बिबट बसलेला होता. दरम्यान, यावेळी पाणंद रस्त्याने जाणाऱ्या ग्रामस्थांवर बिबट्याने अचानक झडप घातली. या हल्ल्यात विलास दादाजी ठाकरे (४८), रेखा खुशाल मडावी (४५), लीलाधर हरिदास मुनघाटे (३१, रा. चांभार्डा) तसेच लुमाजी देवराव मुनघाटे (४०, रा. टेंभा) हे चारही जण जखमी झाले. बिबट्याच्या हल्ल्यात विलास ठाकरे, रेखा मडावी व लुमाजी मुनघाटे यांना गंभीर जखमा झाल्या. तर लीलाधर मुनघाटे यांना बिबट्याच्या नखांचे ओरखडे पडले. जखमींना तातडीने अमिर्झा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात नेण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
‘आरआरटी’ पथकाने पार पाडली माेहीम
माहिती मिळताच पोर्लाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. डी. पाचभाई हे घटनास्थळी दाखल झाले. जखमी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गडचिरोली येथून ‘आरआरटी’ (रॅपिड रिस्पाॅन्स टीम) पाचारण करण्यात आले. सकाळी १०:१५च्या सुमारास टीमने जवळून पाहणी केली असता बिबट्याची हालचाल जाणवली नाही. स्नेअर पोलच्या साहाय्याने तपासणी केली असता तो मृत झाल्याचे स्पष्ट झाले.
मृत्यूचे नेमके कारण काय?
पथकाने मृत बिबट्याच्या शरीराचे सूक्ष्म निरीक्षण केले असता त्याच्या मानेवर आणि अंगावर दुसऱ्या वन्यप्राण्यांच्या दातांच्या व नखांच्या खोल जखमा दिसून आल्या. यावरून या बिबट्याची दुसऱ्या एखाद्या वाघासोबत जबरदस्त झुंज झाली असावी आणि त्यातच तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तवला आहे.