FIR against contractor for 'that' poor mortgage | ‘त्या’ निकृष्ट बंधाराप्रकरणी कंत्राटदारावर एफआयआर
‘त्या’ निकृष्ट बंधाराप्रकरणी कंत्राटदारावर एफआयआर

ठळक मुद्देसमितीच्या चौकशीनंतर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील बोरी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हुडूकदुमा येथे चार महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या निकृष्ट कामामुळे सिमेंट बंधाऱ्याचे दोन तुकडे झाले. याप्रकरणी संबंधित कंत्राटदारासह अधिकाऱ्याविरूद्ध पोलिसात तक्रार करून कायदेशिर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
सदर बंधारा वाहून गेल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर खळबळ उडाली होती. उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी करण्यात आली. त्यात हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आले.
कोरची तालुक्यातील हुडुकदुम्मा क्र.१ व हुडुकदुम्मा क्र.२ येथील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मृद व जलसंधारण विभाग चंद्रपूर यांच्यामार्फत सदर बंधाऱ्याचे काम करण्यात आले होते. या बंधाऱ्याची उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया जाधव व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ए.ए.मेश्राम यांनी संयुक्त पाहणी केली. त्या पाहणीमध्ये प्रथमदर्शनी सदर बंधाऱ्याच्या पायाचे (फाऊंडेशन)चे काम निकृष्ट असल्याचे दिसून आले.
या प्रकाराची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष, जलयुक्त शिवार अभियान समिती, कुरखेडा यांना संबंधित कंत्राटदार व यंत्रणेच्या अधिकाऱ्याविरुद्ध तातडीने एफआयआर नोंदविण्याचे निर्देश दिले. सदर बंधाऱ्याचे काम प्रथमदर्शनी निकृष्ट दर्जाचे दिसून आले आहे. शासनाच्या निधीचा गैरवापर व शासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट होत असल्याने फौजदारी गुन्हे नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले. असा प्रकार यापुढे होऊ नये याकरीता सक्त स्वरुपाची कारवाई आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे.

Web Title: FIR against contractor for 'that' poor mortgage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.