अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वाढीव मानधनासाठी आर्थिक तरतूद

By Admin | Updated: September 26, 2015 01:35 IST2015-09-26T01:35:40+5:302015-09-26T01:35:40+5:30

२२ सप्टेंबर रोजी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार २०१५-१६ च्या वाढीव मानधनासाठी तसेच २०१४-१५ व २०१५-१६ ....

Financial Provision for Increasement of Anganwadi Workers | अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वाढीव मानधनासाठी आर्थिक तरतूद

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वाढीव मानधनासाठी आर्थिक तरतूद

एरिअर्सची प्रतीक्षाच : दोन वर्षांची भाऊबीज भेट देणार
गडचिरोली : २२ सप्टेंबर रोजी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार २०१५-१६ च्या वाढीव मानधनासाठी तसेच २०१४-१५ व २०१५-१६ या दोन वर्षांची भाऊबीज भेट देण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. एप्रिल २०१४ पासूनचे वाढीव वेतन एरिअर्सच्या रूपात देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र सदर एरिअर्सबाबत शासनाने अजून कोणताही निर्णय घेतला नसल्याने अंगणवाडी सेविकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
अंगणवाडी सेविकांना राज्य शासन एक हजार रूपये व केंद्राचे तीन हजार रूपये असे एकूण चार हजार रूपये मानधन दिले जात आहे. अंगणवाडी मदतनीसांना राज्य शासन ७०० व केंद्र शासन १ हजार ५०० रूपये असे एकूण २ हजार २०० रूपये तर मिनी अंगणवाडी सेविकांना राज्य शासन ४०० व केंद्र शासन १ हजार ५०० असे एकूण २ हजार ५०० रूपये मानधन सध्य:स्थितीत देत आहे. वाढलेल्या महागामध्ये सदर मानधन अत्यंत तुटपुंजे असल्याने मानधनात वाढ करावी, यासाठी अंगणवाडी सेविकांनी लढा उभारला होता. अनेक आंदोलने केल्यानंतर यापूर्वीच्या आघाडी शासनाने अंगणवाडी सेविकांच्या मानधनात ९५० रूपये व अंगणवाडी मदतनीसाच्या मानधनात ५०० रूपये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र लगेच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने वाढीव मानधनाची अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर सत्तेत आलेल्या युती शासनाने हातवर करीत वाढीव मानधनाचा निर्णय यापूर्वीच्या शासनाने घेतला आहे. त्यामुळे आपण एप्रिल २०१४ पासून नाही तर एप्रिल २०१५ पासून वाढीव मानधन देऊ, असा निर्णय घेतला. त्याविरोधात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तीव्र लढा उभारला. अखेर शासनाने नमते घेत एप्रिल २०१४ पासून वाढीव मानधन देण्याचे आश्वासन दिले होते. २२ सप्टेंबर रोजी शासनाने निर्णय घेतला असून या निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना २०१५-१६ या वर्षाचे वाढीव मानधन देणे, त्याचबरोबर २०१४-१५ व २०१५-१६ ची भाऊबिज भेट देण्यासाठी १५९ कोटी ८९ लाख १० हजार रूपयांची तरतूद केली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट म्हणून दरवर्षी शासन हजार रूपये बोनस देते. मात्र मागील वर्षी भाऊबीज भेट दिली नव्हती. यावर्षी मात्र दोन्ही वर्षांची मिळून भाऊबीज भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन निर्णयामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एप्रिल २०१५ पासूनचे वाढीव मानधन मिळेल. मात्र २०१४-१५ च्या मानधनासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. सदर मानधनासाठी तत्काळ तरतूद करावी, अशी मागणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Financial Provision for Increasement of Anganwadi Workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.