'जलतारा' योजनेचा अर्ज भरा अन् ४,८०० रुपये मिळवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 15:02 IST2025-01-13T15:00:24+5:302025-01-13T15:02:51+5:30
रोहयो विभाग राबवणार योजना : शेतीला मिळणार भरपूर पाणी

Fill out the 'Jaltara' scheme application form and get Rs. 4,800
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शेतीतून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. शेतातील विहीर, कूपनलिकांची पाणीपातळी खालावू नये तसेच भूजल पातळीत वाढ व्हावी आणि अधिकाधिक जमीन लागवडीखाली यावी म्हणून राज्य शासनाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जलतारा हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे पाणीपातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांची प्रगती होण्यास मदत होणार आहे.
शेतीच्या सिंचनासाठी मोठ्या धरणाचे बांधकाम सरकारला शक्य नाही. त्यामुळे मागेल त्याला विहीर हे धोरण सुरू केले आहे. विहिरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जमिनीतील पाण्याचा उपसा केला जात आहे. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे एक दिवस विहिरींनासुद्धा पाणी राहणार नाही. जमिनीतील पाण्याचा उपसा करण्याबरोबरच पाण्याचा भराव निर्माण होईल, यासाठीसुद्धा प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने या योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरवात केली आहे.
दीड बाय दीड मीटरचा खड्डा खोदावा लागणार
योजनेंतर्गत शेतकऱ्याने आपल्या शेतातील विहीर, बोअरच्या परिसरात अथवा नेहमी पाणी साचणाऱ्या भागाजवळ दीड बाय दीड मीटरचा शोषखड्डा खोदावा. त्यानंतर त्यात दीड इंचाची गिट्टी भरावी लागणार आहे. त्यासाठी एकूण ४ हजार ८०० रुपये मिळणार आहेत.
रोहयो अंतर्गत केले जाणार काम
- जलतारा' या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी रोजगार हमी योजना विभागावर सोपविण्यात आली आहे. आपल्या परिसरातील कृषीसहायक, रोजगार सेवक यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घेता येईल.
- गडचिरोली जिल्ह्यात धानाची शेती आहे. या शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडते. पूर परिस्थिती निर्माण होते. मात्र पावसाळ्यातील संपूर्ण पाणी वाहून जाते व उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पाणी जमिनीत मुरल्यास ही स्थिती निर्माण होणार नाही.
भूजल पातळीत होणार वाढ
- शेतीच्या सिंचनासाठी मोठ्या धरणाचे बांधकाम सरकारला शक्य नाही. त्यामुळे मागेल त्याला विहीर हे धोरण सुरू केले आहे. विहिरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जमिनीतील पाण्याचा उपसा केला जात आहे. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे एक दिवस विहिरींनासुद्धा पाणी राहणार नाही.
- जमिनीतील पाण्याचा उपसा करण्याबरोबरच पाण्याचा भराव निर्माण होईल, यासाठीसुद्धा प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने या योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे. ग्रामीण भागात या योजनेबाबत जागृती होणे आवश्यक आहे.
नेमकी काय आहे 'जलतारा' योजना
शेतातील पाण्याचा योग्य निचरा करून भूजल पातळी वाढविण्यासाठी जलतारा योजना हाती घेण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी सुरू आहे.
कोणता विभाग राबविणार ही योजना ?
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी मजुरांच्या हाताला कामही मिळणार आहे.
कोणती कागदपत्रे ?
योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्याच्या मालकीचे शेत असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचा ७/१२, ८ अ उतारा, आधारकार्ड, मग्रारोहयो अंतर्गतचे जॉबकार्ड गरजेचे आहे.