मुलचेरा : आपल्या जन्मदात्या पित्याची कुऱ्हाडीने हत्या करणाऱ्या आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने ५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. भाऊजी सखाराम गोमासे (३०) रा. मल्लेरा असे न्यायालयीन कोठडी ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. मल्लेरा येथील सखाराम गोमासे (५५) हा इसम २१ आॅगस्ट २०१४ रोजी रात्री भोजनानंतर झोपला होता. त्याची झोपत असताना कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली. मृतक इसमाचा मुलगा भाऊजी गोमासे यांनी स्वत: अज्ञात इसमाने आपल्या वडीलाची कुऱ्हाडीने वार करून करण्यात आल्याची तक्रार मुलचेरा पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे मर्ग दाखल करून तपास केला. या तपासात मृतक मृतक सखाराम गोमासे याची हत्या त्याचा मुलगा भाऊजी सखाराम गोमासे याने केल्याचे नि:ष्पन्न झाले. घरगुती वाद व पैशाच्या कारणावरून वडीलाची हत्या केल्याची कबुली आरोपी भाऊजी गोमासे याने पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपीवर ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. पोलिसांनी आरोपी भाऊजी गोमासे याला २५ आॅगस्ट रोजी गडचिरोलीच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला ५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सध्या आरोपीची चंद्रपूरच्या कारागृहात रवानगी करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)
पित्याचा खून करणाऱ्या आरोपीस कोठडी
By admin | Updated: August 26, 2014 23:26 IST