मुलीच्या मृत्यूच्या धक्क्याने पित्यानेही त्यागले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST2020-02-25T05:00:00+5:302020-02-25T05:00:53+5:30

मागील १५ दिवसांपासून प्रकृती आणखी खालावल्याने शिलाला नागपूर येथील मेडीकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आले होते. त्याच ठिकाणी तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. मुलीच्या निधनाची बातमी ऐकताच तिचे पिता देवाजी वैरागडे हे अतिवदु:खात बुडाले. तिच्या मृत्यूची बातमी त्यांना असह्य करून सोडली.

Father's death sparks death over daughter's death | मुलीच्या मृत्यूच्या धक्क्याने पित्यानेही त्यागले प्राण

मुलीच्या मृत्यूच्या धक्क्याने पित्यानेही त्यागले प्राण

ठळक मुद्देभेंडाळा येथील घटना : हृदयविकाराचा आला झटका

लोकमत न्यूज नेटवर्क
भेंडाळा : आपल्या लाडक्या मुलीचा आजाराने मृत्यू झाल्याचे दु:ख अनावर झाल्याने हृदयविकाराचा झटका येऊन मुलीच्या मृत्यूच्या काही तासानंतर पित्याचाही मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे घडली.
देवाजी पत्रू वैरागडे (५५) रा. भेंडाळा व शिला शत्रुधन लटारे (२०) रा. मेंढा (बोदली) ता.गडचिरोली असे मृत पिता व मुलीचे नाव आहे. शिलाचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले. तिला मेंढा येथे देण्यात आले होते. तिला दोन महिन्याचे बाळही आहे. काही दिवसापूर्वीपासून ती कावीळ आजाराने ग्रस्त होती. तिच्या कुटुंबियांनी उपचार केले. मात्र प्रकृती बिघडतच चालली होती. मागील १५ दिवसांपासून प्रकृती आणखी खालावल्याने शिलाला नागपूर येथील मेडीकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आले होते. त्याच ठिकाणी तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.
मुलीच्या निधनाची बातमी ऐकताच तिचे पिता देवाजी वैरागडे हे अतिवदु:खात बुडाले. तिच्या मृत्यूची बातमी त्यांना असह्य करून सोडली. तसेच शिलाच्या दोन महिन्याच्या बाळाचे काय होणार, याचीही चिंता वैरागडे यांना लागली होती. या दु:खात असतानाच सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास त्यांनाही हृदयविकाराचा झटका आला व त्यांचा मृत्ूयू झाला. मुली पाठोपाठ पित्याचाही मृत्यू झाल्याने वैरागड परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वैरागडे यांच्या पार्थिवावर मार्र्कंडादेव येथील वैनगंगा नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंड असा आप्त परिवार आहे. शिलाच्या पार्थिवावर तिचा मेंढा गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
या हृदयद्रावक घटनेने भेंडाळा गावावर शोककळा पसरली होती. अत्यंत दु:खद वातावरणात वैरागडे यांना गावकऱ्यांनी अखेरचा निरोप दिला.

मुलीचे पार्थिवही बघितले नाही
मुलगी शिला लटारे हिचा रविवारच्या रात्री ९.३० वाजताच्या सुमारास नागपुरात मृत्यू झाला. तिचे पार्थीव मूळ गाव असलेल्या मेंढा येथे आणले जाणार होते. मुलीचे अंतिमदर्शन घेण्याची वडिलांची इच्छा सुध्दा अपुरी राहिली. सोमवारी सकाळीच वैरागडे यांना हृदयविकाराचा झटका आला.

Web Title: Father's death sparks death over daughter's death