पुलाअभावी जीवघेणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:59 IST2017-08-21T00:59:18+5:302017-08-21T00:59:47+5:30
सिरोंचा तालुक्याचा दुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या झिंगानूर परिसरातील कोपेला गावालगत असलेल्या नाल्यावर पूल नसल्याने पावसाळ्यात नाला भरून वाहत असतो.

पुलाअभावी जीवघेणा प्रवास
लोकमत न्यूज नेटवर्क
झिंगानूर : सिरोंचा तालुक्याचा दुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या झिंगानूर परिसरातील कोपेला गावालगत असलेल्या नाल्यावर पूल नसल्याने पावसाळ्यात नाला भरून वाहत असतो. परिणामी जवळपास तीन महिने या परिसरातील गावांचा तालुक्याशी संपर्क तुटतो. पावसाळ्यात नागरिक सायकल, दुचाकीवाहने खांद्यावर उचलून नाला पार करतात. पुलाअभावी नागरिकांना असा जीवघेणा प्रवास करावा लागतो.
झिंगानूरपासून आठ किमी अंतरावर असलेल्या कोपेला लगत नाला पावसाळ्यात दुथडी भरून वाहत असतो. थोडाफार पाऊस झाला तरी नाल्याला पूर येतो. या नाल्यावर डोंगा व अन्य साधनाची उपलब्धता नसल्याने नागरिकांना नाल्यातील पाण्यातून प्रवास करावा लागतो. अनेकदा नागरिकांना पुराच्या पाण्याचा अंदाज येत नाही. शिवाय पुराच्या पाण्याचा प्रवाह तीव्र राहत असल्याने अनेकदा साखळी करून अथवा घोळक्याने नागरिकांना नाला पार करावा लागतो. या नाल्यावर पुलाची निर्मिती झाल्यास परिसरातील गावातील नागरिकांसाठी सोयीचे होऊ शकते. पावसाळ्यात या परिसरातील गावांचा संपर्क तुटलेला असतो. पावसाची रिपरिप चार ते पाच दिवस सुरू राहिल्यास सदर मार्ग बंद होतो. परिणामी नागरिकांना आवागमन करणे, कठिण होते. अशावेळी नागरिकांची अनेक कामे अडतात. त्यामुळे या मार्गावर पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी आहे.
पक्क्या रस्त्यांचाही अभाव
झिंगानूर परिसरातील बहुतांश भाग घनदाट जंगल व डोंगर दºयांनी व्यापला आहे. या परिसरात पक्के रस्ते अद्यापही झालेले नाही. पावसाळ्यात सदर मार्गाने चारचाकी वाहनांना अडसर निर्माण होतो. तरीसुद्धा या भागात रस्त्यांची निर्मिती केली जात नाही. लोकप्रतिनिधीही याकडे दुर्लक्ष करतात. या भागात पक्क्या रस्त्याची प्रतीक्षा आहे.