वीजचाेरीचा भुर्दंड जाेडणी असलेल्या शेतकऱ्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:39 IST2021-08-27T04:39:43+5:302021-08-27T04:39:43+5:30
आरमोरी तालुक्यातील कोरेगाव येथे सन २०१७-१८ मध्ये तालुका कृषी विभागांतर्गत जलयुक्त शिवार योजनेतून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तळ्याची कामे, ...

वीजचाेरीचा भुर्दंड जाेडणी असलेल्या शेतकऱ्यांवर
आरमोरी तालुक्यातील कोरेगाव येथे सन २०१७-१८ मध्ये तालुका कृषी विभागांतर्गत जलयुक्त शिवार योजनेतून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तळ्याची कामे, तसेच सिंचन विहिरीची कामे झाली. मात्र, या सिंचन क्षेत्राखाली आलेल्या शेतकऱ्यांनी शेतात कृषी पंप मिळण्याकरिता डिमांड भरूनही आजतागायत दोन-तीन वर्षांपासून शेतातील विद्युत जोडणी करून दिली नाही. त्यामुळे हे शेतकरी जवळच्या विद्युत खांबावर आपल्या मोटार पंपाच्या विद्युत तारा टाकून शेतातील उत्पन्न घेत आहेत. मात्र, या सर्वांचा भुर्दंड अधिकृतरीत्या ज्यांच्याकडे विद्युत मोटार पंप आहे, त्यांना बसत आहे. विद्युत महावितरण कंपनी थेट शेतकऱ्यांच्या विद्युत मीटरनुसार रीडिंग घेऊन बिल न देता, डीपीवरील सरासरीनुसार अधिकृत मोटार पंपधारकांवर बिलाचा बाेजा टाकत आहे.
ज्या शेतकऱ्यांनी डिमांड भरलेला आहे, अशा शेतकऱ्यांना वीजचोरीपासून वाचवावे. त्याचा भुर्दंड इतर शेतकऱ्यांना होणार नाही, याकरिता या शेतकऱ्यांना त्वरित शेतावरील विद्युत पंपाची जोडणी करून देण्याची मागणी कोरेगाव येथील सरपंच बालाजी गेडाम, रामा घोडाम, धर्मा जांभुळकर, झेलू जांभुळकर, हरिभाऊ शेंडे, मनिराम टेंभुर्णे, विजयराव मरावी, श्रीहरी पुराम, विठ्ठल टेंभुर्णी, साधू आलाम, शांताबाई गेडाम आदी शेतकऱ्यांनी केली आहे.