अधिकच्या वीज बिलाने शेतकरी चक्रावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 05:00 IST2020-12-04T05:00:00+5:302020-12-04T05:00:19+5:30
काेंढाळा परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडे सिंचन विहिरीत आहेत. या शेतकऱ्यांनी विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी माेटारपम्प बसविले आहेत. धानपिकाला पाणी देण्याबराेबरच काही शेतकरी भाजीपाला व रबी हंगामातील काही पिकांची लागवड करतात. शेतकऱ्यांना तीन महिन्याला वीज बिल पाठविले जात हाेते. तीन महिन्यांचे वीज सरासरी दाेन हजार रुपये राहत हाेते.

अधिकच्या वीज बिलाने शेतकरी चक्रावले
नितेश पाटील
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुरूड : देसाईगंज तालुक्यातील काेंढाळा परिसरातील अनेक शेतकऱ्यांना कृषिपम्पाचे वार्षिक वीज बिल ३० हजार रुपयांपेक्षा अधिकचे पाठविले आहे. एवढे माेेठे वीज बिल बघून शेतकऱ्यांना धक्काच पाेहाेचला आहे.
काेंढाळा परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडे सिंचन विहिरीत आहेत. या शेतकऱ्यांनी विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी माेटारपम्प बसविले आहेत. धानपिकाला पाणी देण्याबराेबरच काही शेतकरी भाजीपाला व रबी हंगामातील काही पिकांची लागवड करतात. शेतकऱ्यांना तीन महिन्याला वीज बिल पाठविले जात हाेते. तीन महिन्यांचे वीज सरासरी दाेन हजार रुपये राहत हाेते. मात्र महावितरणने २०२० या वर्षात एकदाही शेतकऱ्यांना बिल पाठविले नाही. नाेव्हेंबर महिन्यात अनेक शेतकऱ्यांना वर्षभराचे वीज बिल मिळाले आहे. हे वीज बिल ३० हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. एवढ्या माेठ्या प्रमाणात आलेले वीज बिल बघून शेतकरी थक्क झाले आहेत.
दाेन महिन्यांपूर्वी वैनगंगेच्या पुराचे पाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शिरले. त्यामुळे वीज मीटर बंद पडून वीज पुरवठा खंडीत झाला हाेता. तेव्हापासून शेतकऱ्यांनी माेटारपंपाचा वापर सुद्धा केला नाही. तरीही सुमारे ३० हजार रुपयांचे वीज बिल पाठविण्यात आले आहे. काही शेतकऱ्यांचे वार्षिक निव्वळ उत्पन्न ३० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. अशा स्थितीत अधिकचे वीज बिल पाठविले असल्याने वीज बिल भरावे, कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. काेंढाळा येथील शेतकरी सायत्राबाई वाढई यांना २९ हजार ३४० रुपये, दत्तू तुपट यांना ३३ हजार १२० रुपयांचे वीज बिल पाठविण्यात आले आहे. अचानक एवढ्या माेठ्याप्रमाणात आलेले वीज बिल बघून वाढई आश्चर्यचकीत झाले आहेत.
अंदाजाने पाठविले बिल
दाेन महिन्यांपूर्वी वैनगंगा नदीला पूर आला या पुरात अनेक शेतकऱ्यांच्या वीज मीटरमध्ये पाणी शिरून वीज मीटर बंद पडले. हे मीटर अजूनही बंदच आहेत. असे असतानाही सुमारे ३० हजार रुपयांचे वीज बिल पाठविले आहे. यावरून महावितरणने अंदाजे वीज बिल पाठविल्याचे स्पष्ट हाेत आहे. या अंदाजीत बिलांचा माेठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. प्रत्यक्ष शेतात जाऊन वीज मीटरची पाहणी करूनच वीज बिल पाठविणे आवश्यक आहे. मात्र महावितरणचे कर्मचारी शेतात न जाताच वीज बिल पाठवित आहेत.
आपल्या तीन महिन्यांचे सरासरी दाेन हजार रुपये बिल पाठविले जात हाेते. विजेच्या वापराएवढेच हे बिल असल्याने भरण्यात काेणतीही अडचण जात नव्हती. मात्र महावितरणने अचानक ३३ हजार रुपयांचे वीज बिल पाठविले आहे. एवढे माेठे विज बिल भरणे शक्य नाही. महावितरणचे कर्मचारी शेतांवर न जाताच अंदाजे वीज बिल पाठवितात. याची झळ शेतकऱ्यांना सहन करावी लागते.
- दत्तू तुपट, शेतकरी, काेंढाळा