Farmers wait for crop insurance | शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा

शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा

ठळक मुद्देनुकसान होऊनही भरपाईपासून वंचित : मानापूर परिसरातील शेतकरी वंचित

लोकमत न्यूज नेटवर्क
मानापूर/देलनवाडी : दिवाळीच्या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे मानापूर, देलनवाडी परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. मात्र एकाही शेतकऱ्याला विम्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे विम्यावरचा विश्वास उडायला लागला आहे.
आकस्मिक स्थितीत पिकाचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने पीक विमा योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक कर्जदार शेतकऱ्याला पीक विमा काढणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे सर्वच पीक कर्जदार शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. पूर्वीच्या तुलनेत विमा काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शेतीचे नुकसान झाल्यानंतर मदत नुकसानभरपाई मिळेल, याच उद्देशाने शेतकऱ्यांनी पीक विमे काढले आहेत. नुकसान झाल्यास नुकसानभरपाई मिळेल, असे आश्वासन अधिकारी वर्गाकडून दिले जाते. मात्र प्रत्यक्षात कोणताच लाभ मिळत नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. शासन व विमा कंपन्या शेतकऱ्यांची लूट करीत आहेत, असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
जड धान पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर असताना तसेच हलके धान कापून झाले असताना पावसाने हजेरी लावली. मानापूर, देलनवाडी परिसराला १५ दिवस पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे हलक्या धानाच्या कडपा पाण्यात भिजल्या. तर जमिनीवर कोसळले. परिणामी दोन्ही प्रकारच्या धानाचे मोठे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांना तर ५० टक्क्याहून कमी उत्पादन झाले. पाण्यात भिजलेले धान व्यापारी खरेदी करण्यास तयार नाहीत. काही शेतकऱ्यांचा तर लागवडीचा खर्च सुद्धा निघाला नाही. अशी बिकट परिस्थिती असतानाही मानापूर परिसरातील एकाही शेतकऱ्याला पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी महादेव मेश्राम, नामदेव किरंगे, बाजीराव पदा, दशरथ रणदिवे, बालाजी पेंदाम, राजेंद्र दशरथ, नामदेव सोनुले, शेषराव मेश्राम, अशोक किरंगे यांनी केली आहे.

विमा मिळण्यासाठी शासनाच्या आदेशाची गरज काय?
शेतकºयांनी पैसे भरून पिकाचा विमा काढला आहे. पिकाचे नुकसान झाल्याने नुकसानभरपाई देणे हे कंपनीचे कर्तव्य आहे. याबाबत काही शेतकºयांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, शासनाचे आदेश प्राप्त झाले नाही, असे उत्तर दिले आहे. विम्याचे पैसे शासनाने दिले नसून शेतकऱ्यांनी भरले आहेत. त्यामुळे नुकसानभरपाई देण्यासाठी शासनाच्या आदेशाची गरज काय, असा प्रश्न शेतकºयांनी केला आहे.

Web Title: Farmers wait for crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.