फूलशेतीकडे शेतकऱ्यांचा कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:27 IST2018-06-25T00:25:39+5:302018-06-25T00:27:42+5:30

फूलशेतीकडे शेतकऱ्यांचा कल
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पारंपरिक पिकांना फाटा देत शेतकरी आता नगदी पिकांकडे वळत चालला आहे. फूल शेती ही फायदेशीर ठरत चालली असल्याने फूल शेतीखालील क्षेत्र वाढत चालले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण पिकांच्या ८० टक्के क्षेत्रावर धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. धान पिकाला सिंचनाची अधिक गरज भासते. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. मोठे सिंचन प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे सिंचनाच्या सुविधा वाढण्यास मर्यादा येत आहेत. पदवी झालेले युवक शासकीय नोकरी उपलब्ध न झाल्याने उत्तम प्रकारे शेती करीत आहेत. यातील काही युवकांनी विविध विभागांकडून प्रशिक्षण घेऊन त्या-त्या पिकांचे प्रयोग आपल्या शेतीमध्ये करीत आहेत. त्यामुळेच दिवसेंदिवस गडचिरोली जिल्ह्यात धानाव्यतिरिक्त इतर पिकांचेही क्षेत्र वाढत चालले आहे. यामध्ये फळबागा, फूलशेतीच समावेश आहे. आरमोरी तालुक्यातील वैरागड परिसरातील शेतकरी फूल शेती करीत असल्याचे दिसून येते. कमी कालावधीत अधिक उत्पादन फूल शेतीच्या माध्यमातून मिळत असल्याने शेतकरी फूलशेतीकडे वळला आहे. फूल अत्यंत नाजूक असल्याने त्याची साठवणूक व वाहतूक व्यवस्थित करावी लागते. यासाठी आधुनिक तंत्रज्ञान कृषी विभागाने उपलब्ध करून दिल्यास फूल शेतीचे क्षेत्र वाढण्यास मदत होईल.