शेतकरी असमाधानी
By Admin | Updated: August 26, 2015 01:11 IST2015-08-26T01:11:24+5:302015-08-26T01:11:24+5:30
दुष्काळ, नापिकी आणि गारपिटीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या विदर्भातील कास्तकारांचे विदारक चित्र काय आहे,

शेतकरी असमाधानी
लोकमत सर्वेक्षण : शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती करू नये
गडचिरोली : दुष्काळ, नापिकी आणि गारपिटीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या विदर्भातील कास्तकारांचे विदारक चित्र काय आहे, हे समजून घेण्याच्या दृष्टीने लोकमतने गडचिरोली जिल्ह्यात तीन तालुक्यांमध्ये १०० शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात प्रत्यक्ष प्रश्नावलीच्या आधारे शेतकऱ्यांशी त्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. या चर्चेतून गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी आता शेतीच्या व्यवसायावर समाधानी नसल्याचे दिसून आले आहे. विविध उत्पन्न गटातील शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली. तसेच विविध वयोगटातील शेतकऱ्यांशीही मुक्त संवाद करण्यात आला. त्यातून पुढे आलेले हे चित्र वाचकांसमोर ठेवण्यात येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात १ लाख १५ हजार ३९६ शेतकरी आहेत. यातील शुन्य ते एक हेक्टर शेती असणारे ४३ हजार ६४९, एक ते दोन हेक्टर शेती असणारे ३६ हजार ३०६ व दोन हेक्टरच्या वर शेती असणारे ३५ हजार ४४१ शेतकरी आहेत. लोकमतने चामोर्शी, आरमोरी, देसाईगंज या कमी-अधिक प्रमाणात सिंचन व्यवस्थेची सोय असलेल्या तालुक्यातील १०० शेतकऱ्यांची सर्वेक्षणासाठी नमुना म्हणून निवड केली. त्यांच्याकडून १० प्रश्न असलेल्या प्रश्नावलीच्या आधारे चर्चा करण्यात आली. त्या चर्चेतून शेतकऱ्यांच्या विविध परिस्थितीचे विदारक वास्तव समोर आले. हे वास्तव राज्यकर्त्यांसमोर ठेवून शेतकऱ्यांसाठी काही उपाययोजना व्हाव्यात, अशी लोकमतची प्रामाणिक इच्छा यामागे आहे.
असा झाला सर्वेक्षणाचा प्रवास
३० हजारापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या २० टक्के शेतकऱ्यांचा सर्वेक्षणात सहभाग होता. ३० ते ५० हजारापर्यंत उत्पन्न असणाऱ्या २५ टक्के शेतकऱ्यांनी यात सहभाग नोंदविला. एक लाख ते दीड लाख उत्पन्न असणाऱ्या १५ टक्के शेतकऱ्यांनी सर्वेक्षणात सहभाग घेतला. दीड ते दोन लाख उत्पन्न असणारे १० टक्के व दोन ते तीन लाख उत्पन्न असणारे ८ टक्के शेतकरी या सर्वेक्षणात सहभागी झाले.