शेतकरी ठाम ! माघार घेणार नाहीत, विमानतळाला इंचभरही जमीन देणार नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 15:19 IST2025-05-09T15:17:19+5:302025-05-09T15:19:31+5:30
Gadchiroli : आंदोलनकर्त्यांच्या भावना शासनाला कळविण्यात येतील, अशी ग्वाही तहसीलदार संतोष आष्टीकर यांनी दिली.

Farmers are firm! They will not back down, they will not give even an inch of land to the airport
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : प्रस्तावित विमानतळाच्या जमीन अधिग्रहणाविरोधात चंद्रपूर मार्गावरील मुरखळा येथे सुरू असलेले शेतकऱ्यांचे उपोषण लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने अकराव्या दिवशी तात्पुरते स्थगित झाले. मात्र, लढा सुरूच राहील, माघार घेणार नाहीत, बापजाद्यांनी कमावलेली इंचभरही जमीन देणार नाहीत... या भूमिकेवर आंदोलक ठाम आहेत.
विमानतळासाठी शहराजवळील नवेगाव, मुरखळा, पुलखल, मुडझा बु, व मुडझा तु या गावांमध्ये भूसंपादनाचा घाट घातलेला आहे. ग्रामसभांनी विमानतळाविरोधात ठराव घेतल्यानंतरही प्रशासनाने शेतकऱ्यांना नोटीस धाडल्या. त्यामुळे मुरखळाचे शरद ब्राम्हणवाडे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी २८ एप्रिलपासून मुरखळा येथे बेमुदत उपोषण सुरू केले. ६ मे पासून शेती बचाव संघर्ष समितीसह महिलांनीही साखळी उपोषण सुरू करून आंदोलनाला पाठिंबा दिला.
दरम्यान, ८ मे रोजी खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार रामदास मसराम, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, माजी पं. स. सभापती मारोतराव इचोडकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणताडे, काँग्रेस शहराध्यक्ष सतीश विधाते यांच्यासह तहसीलदार संतोष आष्टीकर यांच्या उपस्थितीत सरबत देऊन उपोषण सोडविण्यात आले.
१० वर्षापूर्वी विमानतळासाठी चामोर्शी रोडवरील शासकीय विज्ञान कॉलेजलगतच्या झुडपी जंगलाचे सर्वेक्षण झाले होते, तेथेच विमानतळ उभारावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.
सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार
यावेळी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी विकासाला विरोध नाही, पण झुडपी जंगल असताना सुपीक जमिनीचे अधिग्रहण करणे व्यवहार्य नाही, अशी भूमिका मांडली. आमदार रामदास मसराम यांनी येत्या अधिवेशनात हा प्रश्न मांडणार असल्याचे सांगितले. माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ, असे नमूद केले.
जमीन नाही म्हणजे नाही, आजीबाईंनी ठणकावले
आमच्या जमिनी घेणार आणि आम्हाला कुठे पाठविणार, असा सवाल ८० वर्षीय मीरा अर्जुन गेडाम यांनी केला. पोटतिडकीने बोलणाऱ्या आजीबाई पुढे म्हणाल्या, पुराच्या पाण्यात जमिनी गेल्या, तरीही नव्या जोमाने मेहनत करून आम्ही धान पिकवतो. आमच्या जमिनी घेऊन भूमिहीन करणार का, असा प्रश्नही त्यांनी केला. उद्योग, विमानतळ तुम्हाला लखलाभ, पण जमीन मिळणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.