असरअल्लीत बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश, तिघांवर गुन्हा दाखल
By संजय तिपाले | Updated: November 5, 2025 15:09 IST2025-11-05T15:06:26+5:302025-11-05T15:09:55+5:30
Gadchiroli : आरोग्य विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई; चार वर्षांपासून सुरु होता रुग्णांच्या जीवाशी खेळ

Fake doctor exposed in Asar Alli, case registered against three
गडचिरोली : ग्रामीण भागात वैद्यकीय पदवी नसतानाही उपचार करून रुग्णांकडून पैसे वसूल करणाऱ्या तिघांविरुद्ध सिरोंचाच्या असरअल्ली पोलिस ठाण्यात ४ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई तालुक्यातील असरअल्ली गावात करण्यात आली आहे. तब्बल चार वर्षांपासून रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु होता, अशी माहिती चौकशीत समोर आली.
शरद बाबू वेग्ग्लम (६०), चंद्रया भौथू (३९) आणि गौरीशंकर बैरी (५०, सर्व रा. असरअल्ली ता. सिरोंचा) या तिघांनी स्वतःला डॉक्टर म्हणून दाखवत वैद्यकीय व्यवसाय केल्याचे उघड झाले आहे. स्थानिक वैद्यकीय व्यावसायिकांनी दिलेल्या तक्रारीनंतर आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्त तपास मोहीम राबवून हा प्रकार उघडकीस आणला आहे. या गंभीर गुन्ह्याची नोंद सिरोंचा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून उपनिरीक्षक प्रसाद पवार तपास करत आहेत.
पोलिस सूत्रांनी सांगितले की, या रॅकेटमध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, याचा सध्या शोध घेतला जात आहे. तसेच बोगस डॉक्टरांकडून उपचार घेतलेल्या रुग्णांची चौकशीही सुरू आहे.
यांनी केली कारवाई
तपासात त्यांना कोणतीही वैद्यकीय पदवी नसतानाही उपचार केल्याचे समोर आले आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोहर कन्नाके, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश झाडे, आणि उपनिरीक्षक प्रवीण सोनावणे यांनी ही कारवाई केली आहे.
दोघे ताब्यात, एक फरार
दरम्यान, कारवाईवेळी शरद वेग्ग्लम आणि चंद्रया भौथू यांना पथकाने ताब्यात घेतले. त्यांना पोलिसांनी कलम ३५ (५) बीएनएस २०२३ अंतर्गत नोटीस बजावून सोडले, तर गौरीशंकर बैरी हा फरार असून त्याचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दवाखाना थाटून करत होते उपचार
तिघे बोगस डॉक्टर चार वर्षांपासून असरअल्ली येथे दवाखाना थाटून रुग्णांवर बेकायदेशीर उपचार करत होते. त्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असताना आरोग्य विभागाने इतकी वर्षे कारवाई का केली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.