वैनगंगेच्या जलस्तरात कमालीची घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:47 IST2018-11-22T00:46:54+5:302018-11-22T00:47:58+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य नदी म्हणून ओळख असलेल्या वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी यावर्षी नोव्हेंबर महिन्यातच कमालीची घटली आहे. या नदीवर गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा योजना, उपसा जलसिंचन योजना आहेत.

वैनगंगेच्या जलस्तरात कमालीची घट
लोकमत न्यूज नेटवर्क
भेंडाळा : गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य नदी म्हणून ओळख असलेल्या वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी यावर्षी नोव्हेंबर महिन्यातच कमालीची घटली आहे. या नदीवर गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा योजना, उपसा जलसिंचन योजना आहेत. पाणी पातळी घटल्याने पाणीपुरवठा योजनांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
गोसेखुर्द धरण वैनगंगा नदीवर बांधण्यात आले आहे. या धरणाची निर्मिती होण्यापूर्वी वैनगंगा नदीत मार्च, एप्रिल महिन्यापर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी राहत होते.
वैनगंगेची धार पार करणे सहज शक्य होत नव्हते. मात्र मागील चार वर्षांपासून गोसेखुर्द धरणात पाणी अडविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वैनगंगेची बरीच पाणीपातळी कमी झाली आहे. तसेच चामोर्शीजवळ चिचडोह प्रकल्पही वैनगंगा नदीवरच बांधल्या गेला आहे. याही प्रकल्पासाठी पाणी अडविले जात आहे. त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे हरणघाट व त्यापुढील गावांच्या योजना अडचणीत आल्या आहेत.
आॅक्टोबर महिन्यापासून पावसाने उसंत घेतल्याने भूजल पातळीत घट झाली आहे. त्याचबरोबर नदी, नाले आटल्याने भूजलातील पाण्याचा उपसा वाढला आहे. कमी पावसाचाही परिणाम नदीवरही झाला आहे. त्यामुळेही वैनगंगेची पाणीपातळी घटली आहे. डिसेंबर, मार्च महिन्यातच पाणीटंचाईचे संकट तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.