धान उत्पादनात प्रचंड घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 21:18 IST2017-12-28T21:18:00+5:302017-12-28T21:18:43+5:30
अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम परिसरात धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. शेतकऱ्यांनी अनेकदा उपाययोजना करूनही उपयोग झाला नाही. शेवटी धानाची मळणी झाल्यानंतर दरवर्षीच्या तुलनेत ३० ते ४० टक्के उत्पादन झाल्याचे दिसून आले.

धान उत्पादनात प्रचंड घट
लोकमत न्यूज नेटवर्क
गुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम परिसरात धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. शेतकऱ्यांनी अनेकदा उपाययोजना करूनही उपयोग झाला नाही. शेवटी धानाची मळणी झाल्यानंतर दरवर्षीच्या तुलनेत ३० ते ४० टक्के उत्पादन झाल्याचे दिसून आले. धान पेरणीपासून रोवणी व देखभालीचा खर्च, कीटकनाशके व औषधांचा खर्च बघता यंदा शेती तोट्यातच राहिली. त्यामुळे या भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
मागील चार-पाच वर्षांपासून गुड्डीगुडम परिसरात धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने धानाचे उत्पादन घटत आले आहे. यंदाही विविध रोगांचा प्रादुर्भाव धान पिकावर झाल्याने शेतकऱ्यांनी तीन ते चारवेळा कीटकनाशकांची फवारणी केली. तरीसुद्धा रोग नाहीसा झाला नाही. धान पीक निसवा होण्याच्या स्थितीत असताना मावा, तुडतुडा, खोडकिडा, करपा, कडाकरपा, बेरड आदी रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर दिवाळी उत्सवात परतीच्या पावसाने हलक्या धान पिकाचे प्रचंड नुकसान केले. मध्यम व जड प्रतीचे धान पीक जोमात असतानाच रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे धान पीक नष्ट झाले. गुड्डीगुडम परिसरात मागील वर्षी प्रति एकरी प्रति पोत्यात ७० किलो प्रमाणे २८ ते ३० पोते धानाचे उत्पादन झाले होते. परंतु यंदा केवळ ८ ते १० पोते धानाचे उत्पादन झाले आहे. दरवर्षी अपुऱ्या पावसामुळे धानाचे उत्पादन घटत होते. परंतु यंदा समाधानकारक पाऊस येऊनसुद्धा धानाच्या उत्पादनात वाढ झाली नाही. उलट धान पीक मोठ्या प्रमाणावर घटले.
धान पिकाच्या पूर्व मशागतीसह धान रोवणी, कापणी, बांधणी, मळणी यासह मजूर, ट्रॅक्टरचा खर्च आदी खर्च वगळल्यास शेतकऱ्यांना तोटाच सहन करावा लागला. गुड्डीगुडम परिसरात नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षणही करण्यात आले. परंतु अद्यापही या शेतकऱ्यांना कोणताच लाभ मिळाला नाही. यंदा परिसरात ५० टक्के तर काही भागात ३० ते ४० टक्केच उत्पादन झाले आहे. त्यामुळे शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.