वन्य जीवांच्या तृष्णातृप्तीसाठी वर्षभरात तीन कोटी खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 22:53 IST2018-05-21T22:53:31+5:302018-05-21T22:53:55+5:30
वन्यजीवांना जंगलातच पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी वन विभागाने जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत २०१७-१८ या वर्षात सुमारे १ हजार ३३० कामे मंजूर केली आहेत.

वन्य जीवांच्या तृष्णातृप्तीसाठी वर्षभरात तीन कोटी खर्च
दिगांबर जवादे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वन्यजीवांना जंगलातच पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी वन विभागाने जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत २०१७-१८ या वर्षात सुमारे १ हजार ३३० कामे मंजूर केली आहेत. त्यापैकी १०५ कामे पूर्ण झाली असून ५४२ कामे प्रगतीपथावर आहेत. या सर्व कामांसाठी १४ कोटी ९८ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी मार्च अखेरपर्यंत ३ कोटी १२ लाख रूपये खर्च झाले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ७८ टक्के क्षेत्रावर जंगल आहे. या जंगलात मोठ्या प्रमाणात वन्यजीव आहेत. वन विभागाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमुळे दिवसेंदिवस वन्यजीवांची संख्या सुध्दा वाढत चालली आहे. पावसाळा व हिवाळ्यात नैसर्गिक जलसाठ्यांच्या माध्यमातून तहान भागते. त्यानंतर नैसर्गिक जलसाठे आटत असल्याने पाण्यासाठी वन्यजीव गावाकडे धाव घेतात. परिणामी त्यांची शिकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर पाण्याअभावी वन्यजीवांना प्राण गमवण्याची पाळी येते. वन्यजीवांना जंगलातच पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी वन विभागाच्या मार्फत जलसाठा वाढविण्यासाठी वनतळे, नाला खोलीकरण, गॅबीयन बंधारे, वनतलाव खोलीकरण, दगडी बंधारे, डिप सीसीटी सिमेंट बंधारे आदींची कामे हाती घेतली आहेत. २०१७-१८ मध्ये जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत १ हजार ३३० कामे मंजूर करण्यात आली आहेत. या कामासाठी १४ कोटी ९८ लाख ६४ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला.
मार्च २०१८ पर्यंत १०५ कामे पूर्ण झाली आहेत. पूर्ण झालेल्या कामांवर १ कोटी ५७ लाख २१ हजार रूपयांचा खर्च झाला आहे. तर ५४२ कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांवर १ कोटी ५४ लाख ८ हजार रूपयांचा निधी खर्च झाला आहे. या कामांमुळे वन्यजीवांची तहान भागविण्याबरोबरच भूजलसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे.
४२७ गॅबीयन बंधारे बांधले
जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने दगडाचा बंधारा टिकू शकत नाही. त्यामुळे गॅबीयन पध्दतीचा बंधारा बांधला जातो. या बंधाºयाचे बांधकाम करताना १५ बाय १५ सेंटीमिटरची जाळी अंथरली जाते. त्यावर दगड ठेवले जातात. दगडांमधील पोकळी लहान चिपांनी बंद केली जाते. आलापल्ली वन विभागांतर्गत यावर्षी ३२५ गॅबीयन बंधारे मंजूर झाले आहेत. त्याचबरोबर भामरागड वन विभागांतर्गत २३ व सिरोंचा वन विभागांतर्गत ७९ बंधारे मंजूर आहेत.
मागील वर्षी झाली ६८३ कामे
जलयुक्त शिवार अभियानअंतर्गतच गडचिरोली जिल्ह्यातील जंगलामध्ये मागील वर्षी ६८३ कामे मंजूर करण्यात आली. यामध्ये आलापल्ली वन विभागांतर्गत २०० कामे, भामरागड वन विभागांतर्गत १६४ कामे, सिरोंचा वन विभागांतर्गत १७८ कामे, गडचिरोली वन विभागांतर्गत ६५ कामे, देसाईगंज वन विभागांतर्गत ७६ कामांचा समावेश आहे. या सर्व कामांसाठी १० कोटी ५४ लाख ५८ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला. ही सर्वच कामे पूर्ण झाली असून या कामांवर १० कोटी ८ लाख ६७ हजार रूपये खर्च झाले आहेत.