मतदान व नामांकनावर बहिष्कार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST2020-03-10T05:00:00+5:302020-03-10T05:00:17+5:30
गावांसाठी तीन स्वतंत्र ग्रामपंचायती कराव्या, असा प्रस्ताव मागील दीड वर्षापासून विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात धूळखात पडला आहे. शासन व प्रशासन या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करीत असल्याने २९ मार्चला होणाऱ्या ग्रा.पं.निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा इशारा गावातील नागरिकांनी दिला आहे.

मतदान व नामांकनावर बहिष्कार?
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : स्थानिक पंचायत समितीअंतर्गत सिर्सी ग्रामपंचायतीच्या हद्दीत आठ गावांचा समावेश आहे. ग्रा.पं.चे विभाजन करून आठ गावांसाठी तीन स्वतंत्र ग्रामपंचायती कराव्या, असा प्रस्ताव मागील दीड वर्षापासून विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात धूळखात पडला आहे. शासन व प्रशासन या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करीत असल्याने २९ मार्चला होणाऱ्या ग्रा.पं.निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा इशारा गावातील नागरिकांनी दिला आहे.
यासंदर्भात सिर्सी गावातील नागरिकांनी थेट गडचिरोलीचे जिल्हाधिकारी कार्यालय गाठून सोमवारी नायब तहसीलदारांना निवेदन दिले. सिर्सी ग्रा.पं.च्या निवडणुकीत एकही व्यक्ती नामांकन दाखल करणार नाही तसेच मतदान करणार नाही, असे स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना विश्वेश्वर दर्रो, लुमेश रोहणकर, उमाजी भुसारी, सुरेश फुकटे, नेवचंद सेलोटे, अशोक फुकटे, टिकाराम मडावी, प्रकाश भुसारी यांच्यासह विहीरगाव, नरोटी चक, गणेशपूर, सिर्सी आदी गावातील नागरिक उपस्थित होते.
सिर्सी ग्रामपंचायतीअंतर्गत सिर्सी, गणेशपूर नं.१, गणेशपूर नं.२, मोहटोला कुकडी, विहीरगाव, नरोटी माल, नरोटी चक आदी गावांचा समावेश होतो. ग्रा.पं. मुख्यालयापासून नरोटी हे गाव १० किमी अंतरावर आहे. विहीरगाव, मोहटोला, कुकडी येथील गावकऱ्यांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयीन कामासाठी ७ ते ८ किमीचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे नरोटी माल व नरोटी चक अशी दोन गावे मिळून एक ग्रामपंचायत आहे. एक ग्रामपंचायत, विहीरगाव, कुकडी, मोहटोेला या तीन गावांसाठी एक ग्रामपंचायत व सिर्सी, गणेशपूर नं.१, गणेशपूर नं.२ या तीन गावांसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत आहे.
सिर्सी ग्रामपंचायतीचे विभाजन करून स्वतंत्र ग्रामपंचायती निर्माण कराव्या, ही गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण न झाल्याने नागरिकांनी यंदाच्या ग्रा.पं. निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला आहे. मागणीच्या निवेदनाची प्रत विभागीय आयुक्त नागपूर, तहसीलदार आरमोरी, बीडीओ आरमोरी व पोलीस निरीक्षकांना पाठविण्यात आले आहे.