जंगली हत्ती बघण्याची उत्सुकता जिवावर बेतली, हत्तींनी चिरडून इसमाच्या पायाला जबर दुखापत
By दिगांबर जवादे | Updated: September 17, 2022 21:11 IST2022-09-17T21:10:28+5:302022-09-17T21:11:08+5:30
जंगली हत्तींचा कळप बघण्याची उत्सुकता एका ३८ वर्षीय इसमाच्या जिवावर बेतली.

जंगली हत्ती बघण्याची उत्सुकता जिवावर बेतली, हत्तींनी चिरडून इसमाच्या पायाला जबर दुखापत
कूरखेडा (गडचिराेली): जंगली हत्तींचा कळप बघण्याची उत्सुकता एका ३८ वर्षीय इसमाच्या जिवावर बेतली. हत्तीने पायाखाली चिरडत इसमाच्या एका पायाचा चेंदामेंदा केला. सुदैवाने हत्तीने पुन्हा वार केले नाही. त्यामुळे इसमाचा जीव वाचला. ही घटना शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घाटी जगंलात घडली.
ज्ञानेश्वर शामराव गहाणे रा. कुंभीटाेला असे जखमी इसमाचे नाव आहे. ज्ञानेश्वर हा आपल्या दोन सहकाऱ्यांसह काही कामानिमीत्य कढोली येथे जात होता. दरम्यान घाटी गावाजवळ जगंलात हत्तीचा कळप असल्याची कुणकुण त्यांना लागली. त्यांनी दुचाकी रस्त्यावर ठेवून जगंलात प्रवेश केला. काही अंतर गेल्यावर एका मोठ्या झाडाच्या मागे हत्ती समाेर दिसून आला. हत्तीला एकदम बघताच तिघांचीही घाबरगुंडी उडाली. तिघेही मागे वळून धावू लागले.
धावताना ज्ञानेश्वर गहाणे याचा तोल गेल्याने ताे जमिनीवर पडला. मागून येणाऱ्या हत्तीने ज्ञानेश्वरच्या पायावर पाय ठेवला. ज्ञानेश्वरने आरडाओरड करताच हत्तीने फार वार न करता परत गेला. मात्र हत्तीच्या वजनाने ज्ञानेश्वरचा पाय चिरडला गेला. त्याच्या पायाचा चेंदामेंदा झाला. हत्तीने पुन्हा हल्ला न करता तिथून निघून गेला त्यामुळे त्याचा जीव वाचला. यावेळी सहकारी मनोज परशूरामकर व माजी सरपंच मनिराम उईके यांनी जखमी गहाणे याला खांद्यावर पकडून रस्त्यावर आणले. चारचाकी वाहनाने कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयात पोहचविले.