तीन हजार २८ मृद नमुन्यांची तपासणी
By Admin | Updated: March 12, 2015 01:55 IST2015-03-12T01:55:05+5:302015-03-12T01:55:05+5:30
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन २०१४-१५ या वर्षात जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी कार्यालयाला २७८ गावातील चार हजार २९७ मृद नमूने तपासणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

तीन हजार २८ मृद नमुन्यांची तपासणी
गडचिरोली : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन २०१४-१५ या वर्षात जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी कार्यालयाला २७८ गावातील चार हजार २९७ मृद नमूने तपासणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. फेब्रुवारी अखेरपर्यंत २५४ गावातील शेतकऱ्यांकडून तीन हजार ६७१ मृद नमूने तपासणीसाठी कार्यालयाला प्राप्त झाले. यापैकी २१९ गावातील शेतकऱ्यांचे तीन हजार २८ मृद नमुन्याची तपासणी करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांकडून मिळाली आहे. विना अनुदानित कार्यक्रमांतर्गत मृद नमूने तपासणीची टक्केवारी केवळ १८ टक्के आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद असल्याचे यावरून स्पष्ट होते.
पीक उत्पादनामध्ये जमीन हा अत्यंत महत्त्वाचा नैसर्गिक घटक आहे. जमिनीची सुपिकता व उत्पादकता या दोन्ही बाबी पीक उत्पादन वाढीस उपयुक्त ठरतात. मात्र अलिकडे शेतीतून अधिक उत्पादन मिळविण्याच्या प्रयत्नात रासायनिक खताचा अवाजवी व असंतुलित वापर, जमीन सतत पिकाखाली राहणे, पाण्याचा अयोग्य वापर आदींमुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. परिणामी उत्पादनाच्या गुणधर्मामध्ये घट येत आहे. त्यामुळे शेत जमिनीची सुपिकता व उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी मृद व पाणी परीक्षण करणे अत्यावश्यक आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मृद सर्वेक्षण, मृद चाचणी अधिकारी जिल्हा कार्यालयाने मृद नमुने तपासणीसाठी २०१४-१५ या वर्षात २७८ गावांची निवड केली. यापैकी २५१ गावातील तीन हजार ५९५ सर्वसाधारण नमूने जिल्हा कार्यालयाला प्राप्त झाले. जिल्हा कार्यालयाने फेब्रुवारी अखेरपर्यंत मृद नमूने तपासणी केल्याची टक्केवारी ८४ आहे. सदर राष्ट्रीय कृषी विकास योजना ही शेतकऱ्यांसाठी विनामूल्य असल्यामुळे या योजनेला बऱ्यापैकी प्रतिसाद आहे. तरी कृषी विभागाच्या वतीने गावागावात मृद नमूने तपासणीबाबत प्रभावी जनजागृती करण्यात न आल्यामुळे इतर जिल्ह्याच्या तुलनेत मृद नमूने तपासणीचे प्रमाण कमी आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
विनाअनुदानित कार्यक्रमांतर्गत केवळ १८ टक्केच नमूने तपासणी
विनाअनुदानित कार्यक्रमांतर्गत सन २०१४-१५ या वर्षात सहा हजार ७५० सर्वसाधारण, ६७५ विशेष नमूने तसेच ६७५ पाण्याचे नमूने व सूक्ष्म मूलद्रव्याचे सहा हजार ७५० एवढे जिल्हा मृद चाचणी अधिकारी कार्यालयाला उद्दिष्ट होते. मात्र फेब्रुवारी अखेरपर्यंत या सर्व प्रकारच्या नमूने तपासणीची टक्केवारी केवळ १८ टक्के आहे. जिल्हा प्रयोगशाळेत या कार्यक्रमांतर्गत एक हजार २११ सर्वसाधारण नमूने तपासणी करण्यात आले. ६४ विशेष नमूने, १४७ पाणी नमूने व सूक्ष्म मूलद्रव्याचे केवळ १४० नमूने तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे. विनाअनुदानित कार्यक्रमांतर्गत सर्व प्रकारच्या एकूण १४ हजार ८५० नमूने तपासणीचे उद्दिष्ट होते. यापैकी आतापर्यंत एक हजार ५६२ नमुन्याची तपासणी करण्यात आली असून याची टक्केवारी १८ आहे. कृषी विभागाच्या प्रभावी जनजागृतीअभावी शुल्क भरून तपासणीसाठी नमूने देण्यास शेतकरी तयार झाले नाही. त्यामुळे मृद व पाणी नमूने तपासणीचे प्रमाण कमी आहे.