घरी राहूनही अख्ख्या कुटुंबाने केली काेराेनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:34 IST2021-05-01T04:34:42+5:302021-05-01T04:34:42+5:30
गडचिराेली : काेराेनाचे लक्षण दिसताच त्यांनी चाचणी करून घेतली. पॉझिटिव्हचा अहवालही हाती आला. अशा स्थितीत घाबरून न जाता एकमेकांना ...

घरी राहूनही अख्ख्या कुटुंबाने केली काेराेनावर मात
गडचिराेली : काेराेनाचे लक्षण दिसताच त्यांनी चाचणी करून घेतली. पॉझिटिव्हचा अहवालही हाती आला. अशा स्थितीत घाबरून न जाता एकमेकांना धीर देत डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच राहून औषधोपचार घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. काेविडच्या नियमांचे पालन, डाॅक्टरांनी दिलेला औषधाेपचार आणि सकारात्मक विचार ठेवून त्या कुटुंबाने गृहविलगीकरणातच कोरोनावर सहजपणे मात केली. हे कुटुंब आहे गडचिरोलीच्या कन्नमवार नगरातील बारसिंगे यांचे. जिल्ह्यात त्यांच्याप्रमाणे अनेक कुटुंबांनी याच पद्धतीने कोरोनाला हरवून अनेकांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
पेशाने शिक्षण विभागात केंद्रप्रमुख असलेले प्रभाकर बारसिंगे, त्यांची पत्नी प्रतिभा, मुलगा सिद्धांत ही मंडळी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काेराेना पाॅझिटिव्ह आली हाेती. या शिक्षक दाम्पत्याने व त्यांच्या मुलाने आत्मविश्वासाने काेराेनावर यशस्विरित्या मात केली. चार सदस्यांपैकी एक सदस्यवगळता तिघेजण पाॅझिटिव्ह आले. लहान मुलगा विभास याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला बाहेरगावी पाठविण्यात आले. पाॅझिटिव्ह आलेल्या तिघांनीही गृहविलगीकरणात राहून याेग्य काळजी घेतली आणि काेराेनावर मात केली. बारसिंगे यांच्याप्रमाणेच शिक्षक पुरुषोत्तम म्हस्के व त्यांच्या पत्नीनेही गृहविलगीकरणात कोरोनावर मात केली.
काेट....
आम्ही एकाच कुटुंबातील तिघेजण काेराेना पाॅझिटिव्ह आलाे. अशा परिस्थितीत घरी राहून डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधाेपचार घेतला. विशेष म्हणजे शासकीय रुग्णालयांतीलच गाेळ्या घेतल्या. आहाराकडे विशेष लक्ष दिले. सकारात्मक विचार व आत्मविश्वासाने काेराेनावर मात केली.
- प्रभाकर बारसिंगे
काेट...
घरी राहून याेग्य औषधाेपचार घेतला. त्यापूर्वी आम्ही दाेघेजण काेराेनाचा पहिला डाेस घेतला हाेता. त्यामुळे या लसीचासुद्धा फायदा झाला. आम्ही कुणालाही संपर्कात येऊ दिले नाही. फळ, अंडी व तत्सम आहार घेतला. त्यामुळे १८ वर्षांवरील नागरिकांनी आवर्जून काेराेनाची लस घेतली पाहिजे.
- प्रतिभा बारसिंगे
काेट...
आम्हा पती-पत्नीचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला हाेता. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही घरीच राहून याेग्य औषधाेपचार घेतला. काेविड नियमांचे पालन करून परिपूर्ण काळजी घेतली. १४ दिवस गृहविलगीकरणाचा कालावधी संपला असून आता प्रकृती पूर्णपणे बरी आहे.
- पुरुषाेत्तम म्हस्के