लोकबिरादरी प्रकल्पातर्फे दौंड व सायकल स्पर्धा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:35 IST2021-03-16T04:35:57+5:302021-03-16T04:35:57+5:30
भामरागड - तालुक्यातील लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे महिलांसाठी ४ कि.मी. अंतर धावणे व ५ कि.मी. सायकल चालविण्याची स्पर्धा घेण्यात ...

लोकबिरादरी प्रकल्पातर्फे दौंड व सायकल स्पर्धा उत्साहात
भामरागड - तालुक्यातील लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे महिलांसाठी ४ कि.मी. अंतर धावणे व ५ कि.मी. सायकल चालविण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सर्वप्रथम कर्मयोगी बाबा आमटे व साधनाताई आमटे यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून व दीप प्रज्वलित करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. जेष्ठ समाजसेविका डॉ.मंदाकिनी प्रकाश आमटे यांनी स्पर्धकांना हिरवी झेंडी दाखविली. याप्रसंगी लोकबिरादरी हॉस्पिटलचे संचालक डॉ.दिवंगत आमटे, लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, प्राचार्य विलास तळवेकर, प्रकल्पातील कार्यकर्ते शैलेश खुळे, सचिन मुक्कावार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
लोकबिरादरी प्रकल्प ते भामरागड वनविभाग नाका व परत प्रकल्पापर्यंत ५ कि.मी. अंतराची सायकल स्पर्धा घेण्यात आली. यात समीक्षा गोडसे यांनी १४.२६ मि. वेळ नोंदवित प्रथम क्रमांक पटकाविला. ऋतुजा शिंदे यांनी द्वितीय तर डॉ.अनघा आमटे १६.४० मि. वेळ नाेंदवित तृतीय क्रमांक पटकाविला. ४ कि.मी.धावण्याच्या स्पर्धेत यामिनी चापले यांनी प्रथम, सिंधू मज्जी द्वितीय तर सविता मडावी यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. सायकल स्पर्धेत १७ महिलांनी भाग घेतला होता. धावण्याच्या स्पर्धेत २५ ते ३० महिलांनी सहभाग नोंदविला. सर्व प्रावीण्यप्राप्त व सहभागी महिलांना डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते प्रावीण्य प्रमाणपत्र व सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर मुलींनी स्वतःचे संरक्षण कसे करावे, यांचे प्रात्यक्षिक ऋतुजा फडणीस यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले. लोकबिरादरी आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक विवेक दुबे, तुषार कापगते, गणेश हिवरकर, अशोक चापले आदींनी सहकार्य केले.