राज्य मार्गालाही अतिक्रमणाची वाळवी
By Admin | Updated: November 22, 2015 01:27 IST2015-11-22T01:27:12+5:302015-11-22T01:27:12+5:30
शहरातील आयटीआय ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजुला अतिक्रमण करण्यास सुरुवात झाली असून ...

राज्य मार्गालाही अतिक्रमणाची वाळवी
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : आयटीआय ते रुग्णालयापर्यंत जागा बळकाविण्याचा आटापिटा सुरू
गडचिरोली : शहरातील आयटीआय ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजुला अतिक्रमण करण्यास सुरुवात झाली असून काही नागरिकांनी जागा साफ करून त्यावर बल्ल्या गाडूून जागा आरक्षित करणे सुरू केले आहे. काही दुकानदारांनी दुकानही थाटले आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले असून भविष्यात शहारातील अतिक्रमणाप्रमाणेच या मार्गावरीलही अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गडचिरोली शहरातील चारही मुख्य मार्ग तसेच अंतर्गत मार्गांवरीलही जागा बळकावून त्यावर दुकान थाटले आहेत. मात्र आयटीआय चौक ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत आयटीआय, कृषी विज्ञान केंद्र वगळता एकही कार्यालय नसल्याने या ठिकाणी दुकान सुरू करण्यास फारसा वाव नव्हता. त्यामुळे या ठिकाणी अतिक्रमणाची समस्या आजपर्यंत निर्माण झाली नाही. मात्र मागील तीन ते चार वर्षांपासून या ठिकाणी कृषी महाविद्यालय झाले आहे. आयटीआयची प्रशस्त इमारत बांधण्यात आली असून या ठिकाणचे अभ्यासक्रमही वाढले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या आपसुकच वाढली आहे. त्याचबरोबर या परिसरातील लोकवस्तीमध्ये हळूहळू वाढ होत असल्याने या परिसरातही आता दिवसभर नागरिकांची गर्दी वाढली आहे.
दोन वर्षांपूर्वी आयटीआयच्या समोर काही नागरिकांनी अतिक्रमण करून जागा बळकावली होती. त्यावर आता अनेकांनी दुकानही थाटले आहे. हळूहळू या अतिक्रमणाचा विस्तार होत चालला आहे. आयटीआय ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजुला मोठी झाडे व झुडूपे आहेत. काही कार्यालयांनी संरक्षण भिंत बांधली आहे.
या ठिकाणचे झुडूपे व झाडे तोडून त्यावर माती, विटा, गोटे टाकून जागेचे सपाटीकरण केले जात आहे. काही नागरिकांनी झाडे, झुडूपे तोडून त्यावर बल्ल्या गाडून जागा आरक्षित केली आहे. त्यामुळे सहा महिन्यांत या ठिकाणची पूर्ण जागा अतिक्रमणात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. (नगर प्रतिनिधी)
पावसाचे पाणी वाहून जाण्यास निर्माण होणार अडथळा
आयटीआय ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंतच्या राज्य महामार्गावर दोन्ही बाजूला शासकीय जागा आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यालयाने राज्य महामार्गापासून २५ ते ३० मीटर जागा दोन्ही बाजूला सोडून दोन्ही बाजुला संरक्षण भिंत बांधली आहे. या संरक्षण भिंतीजवळून नाली खोदण्यात आली आहे. या नालीद्वारे या परिसरातील सांडपाणी, पावसाचे पाणी वाहून नेले जाते. मात्र अतिक्रमणधारकांनी नाल्याच बुजविणे सुरू केले आहे. त्यामुळे पाणी वाहून जाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाली बुजल्यास या परिसरातील पाणी डांबरी रस्त्यावरून वाहण्याची शक्यता आहे.
अतिक्रमणाचा प्रश्न होणार गंभीर
ज्या नागरिकांनी यापूर्वी अतिक्रमण केले आहे. ते अतिक्रमण काढण्यासाठी नगर पालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाची दमछाक उडत आहे. अतिक्रमण काढण्याची मोहीम संपल्यानंतर अतिक्रमण जैसे थे होत आहे. या ठिकाणीही अतिक्रमण करून दुकाने थाटल्यानंतर सदर अतिक्रमण काढणे प्रशासनासाठी फार मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने व नगर परिषदेने संयुक्त मोहीम राबवून या ठिकाणी लावण्यात येत असलेले अतिक्रमण तत्काळ हटवावे, जेणेकरून भविष्यातील संकट टाळता येईल, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.