अतिक्रमणामुळे जलसाठवणूक क्षमता घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:36 IST2021-04-01T04:36:58+5:302021-04-01T04:36:58+5:30
आलापल्ली : अहेरी तालुक्याच्या अनेक गावालगत माजी मालगुजारी तलाव आहे. शिवाय वनतलावही आहेत. शेतजमीन तयार करण्याच्या नावाखाली बऱ्याच तलावांमध्ये ...

अतिक्रमणामुळे जलसाठवणूक क्षमता घटली
आलापल्ली : अहेरी तालुक्याच्या अनेक गावालगत माजी मालगुजारी तलाव आहे. शिवाय वनतलावही आहेत. शेतजमीन तयार करण्याच्या नावाखाली बऱ्याच तलावांमध्ये अतिक्रमण वाढले आहे.
आलापल्ली येथील तलावाच्या सभोवताली अतिक्रमणाचा विळखा निर्माण झाला असून विविध प्रकारच्या वनस्पतीने या तलावाला वेढा घातला आहे. दुर्लक्षितपणामुळे देखभालीअभावी या तलावाचे रूपांतर आता बोडीत झाले आहे. येथील भामरागड मुख्य मार्गावर असलेल्या एकमेव मामा तलावाच्या दुरुस्तीकडे प्रशासकीय यंत्रणेचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. खोलीकरणाअभावी या तलावात अधिक प्रमाणात पाण्याची साठवणूक होण्यास अडचणी येत आहेत. या तलावाच्या दुरवस्थेमुळे गावातील जलस्त्रोतांची पाण्याची पातळी खालावली आहे.
दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच तलाव काेरडे पडतात. अनेक तलावांचा उपसा न झाल्याने पाणी साठवून राहत नाही. त्यातच पुन्हा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून तलावाचा बहुतांश भाग गिळंकृत केला आहे. या समस्येमुळे जलसाठवणूक क्षमता घटत आहे. या समस्येकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.