चारोळीने दिला शेकडोंना रोजगार
By Admin | Updated: January 18, 2016 01:34 IST2016-01-18T01:34:57+5:302016-01-18T01:34:57+5:30
जिल्ह्यातील जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात चाराची झाडे आहेत. चारांच्या बिया विक्री करण्याची व्यवस्था नसल्याने ....

चारोळीने दिला शेकडोंना रोजगार
८६ लाख रूपयांच्या चारोळीची विक्री : गडचिरोली वन विभागांतर्गत सर्वाधिक संकलन
गडचिरोली : जिल्ह्यातील जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात चाराची झाडे आहेत. चारांच्या बिया विक्री करण्याची व्यवस्था नसल्याने सदर बिया फेकून दिल्या जात होत्या. मात्र वन विभागाने या बिया खरेदी करण्यास सुरूवात केल्याने या बियांच्या माध्यमातून शेकडो कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला आहे. वर्षभरात सुमारे ८६ लाख ५० हजार रूपयांची चारोळी वन विभागाने खरेदी केली आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात मोहफूल, हिरडा, चारोळी, आवळा, बेहडा, करंज, कुसूम आदी प्रकारचे प्रकारचे झाडे आहेत. औषधी गुणधर्म असलेली सदर झाडे असल्याने त्यांना विशेष मागणी आहे. सदर वनोपज दुर्गम भागातील आदिवासी अत्यंत मेहनत करून गोळा करीत असले तरी त्यांना व्यापाऱ्यांकडून योग्य भाव दिला जात नव्हता. त्यामुळे अनेकांनी वनोपज संकलन करणेही बंद केले होते.
वन विभागाने पुढाकार घेत आदिवासी स्वत: खरेदी करण्यास सुरूवात केली आहे. वन विभागामुळे वनोपजाला अधिकृत खरेदीदार प्राप्त झाला आहे. गडचिरोली वन विभागांतर्गत ४९ लाख ५७ हजार ७१४ रूपये किमतीचे सुमारे ४०० क्विंटल, वडसा वन विभागांतर्गत १३८ क्विंटल, आलापल्ली वन विभागांतर्गत १५० क्विंटल, भामरागड वन विभागांतर्गत १३० व सिरोंचा वन विभागांतर्गत पाच क्विंटल अशी एकूण ८२३ क्विंटल चारोळी खरेदी करण्यात आली. या सर्वांची किमत ८६ लाख ५० हजार ८५४ रूपये एवढी आहे. मागील वर्षी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात गौण वनोपजाची खरेदी करण्यात आली आहे. वन विभागाच्या मार्फतीने योग्य भाव मिळत असल्याने दुर्गम भागातील नागरिक वनोपज खरेदी करण्याकडे वळत चालला आहे. चारोळीबरोबरच ५६ हजार रूपयांचा हिरडा, ४ लाख ३४ हजार ६१ रूपयांचे डिंक, ५ लाख २८ हजार १३८ रूपयांचे कुसूम गोळा करण्यात आले आहे.
चारोळीला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी आहे. त्याचबरोबर गडचिरोली येथील चारांचा दर्जा इतर भागातील चारांच्या अतिशय चांगला आहे. त्यामुळे गडचिरोलीच्या चार बियांना अत्यंत चांगली मागणी आहे. परिणामी गडचिरोलीच्या जंगलातील चार बिया हातोहात खपत असल्याचा अनुभव वन विभागाला आला असल्याने वन विभाग सुध्दा स्वत: खरेदी करण्यास इच्छुक आहे. वनोपजाच्या माध्यमातून शेकडो कुटुंबांना बारमाही रोजगार उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. (नगर प्रतिनिधी)