गडचिरोली : चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला चालना देण्यासाठी गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठ सुरू करण्यात आले. परंतु या विद्यापीठाच्या अॅकाडमीक कमिट्या स्थापन करण्यात आलेल्या नाही. तसेच कुलगुरूचे रिक्त पदही भरण्यात आलेले नाही. आठ दिवसाच्या आत गोंडवाना विद्यापीठाच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले होते. हे आश्वासन हवेत विरले आहे व गोंडवाना विद्यापीठ दररोज विविध समस्यांचा सामना करीत आहे. २०११ मध्ये गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यात आले. विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर विद्वत्त व व्यवस्थापन समित्यांसह अन्य समित्या स्थापन होणे आवश्यक होते. या समित्यांच्या माध्यमातून विद्यापीठात अभ्यासक्रम निश्चिती तसेच अन्य प्रशासकीय काम पार पाडले जातात. याबाबत राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे प्रस्तावही सादर करण्यात आला. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून या प्रस्तावावर काहीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे एकही समिती स्थापन झालेली नाही. त्यातच मार्च महिन्यात गोंडवाना विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. विजय आर्इंचवार सेवानिवृत्त झालेत. त्यांच्या जागीही नवा कुलगुरू नियुक्तीची प्रक्रिया रखडलेली आहे. या समित्या नसल्याने विद्यापीठातील प्राध्यापकांची भरतीही तांत्रिक अडचणीत सापडून रखडलेली आहे. अलिकडेच १२ आॅगस्टला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गडचिरोली आले असताना त्यांना या संदर्भात विचारणा करण्यात आली. यावेळी पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी त्यांच्या समक्ष गोंडवाना विद्यापीठाच्या समस्या आठ दिवसात निकाली काढू, असे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप एकही प्रश्न निकाली निघालेला नाही. गोंडवाना विद्यापीठाला वनविभागाकडून जमिनही मिळालेली नाही. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक विकासात मोठा अडचण निर्माण झाला आहे व राज्य सरकार गोंडवाना विद्यापीठाच्या प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष करीत आहे, असा संदेश सर्वसामान्यांमध्ये गेला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
आठ दिवसांचा अवधी संपला; विद्यापीठाच्या समस्या कायमच
By admin | Updated: August 20, 2014 23:31 IST