दिगांबर जवादे लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : असंघटित क्षेत्रातील कामगारांची माहिती केंद्र शासनाला मिळावी. त्यानुसार योजना आखता येईल यासाठी ई-श्रम कार्ड नोंदणी केली जात आहे. जिल्ह्यात ३ लाख २० हजार ७५८ नागरिकांनी नोंदणी केली आहे. मात्र जवळपास तीन वर्षांचा कालावधी उलटूनही एकाही नोंदणीधारकाला कोणत्याच योजनेचा लाभ देण्यात आला नाही. त्यामुळे नोंदणीचा फायदा काय? असा प्रश्न उपस्थित होत आहेत.
शासनाच्या सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांसह विमा योजनेचा लाभ मिळावा, या उद्देशाने शासनाने असंघटित क्षेत्रातील कामगारांचा डेटाबेस तयार करण्याच्या उद्देशाने ऑगस्ट २०२१ पासून ई-श्रम पोर्टलवर नोंदणी सुरू केली आहे. केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळेल या आशेने जिल्ह्यातील शेतीशी संबंधित, बांधकाम, घरकाम, चर्मोद्योग क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, ऑटोमोबाइल, शिवणकाम आदी क्षेत्रातील कामगारांनी नोंदणी केली आहे.
ई-श्रम नोंदणीसाठी अशी लागणार पात्रता
- ई-श्रम कार्ड नोंदणीसाठी असंघटित क्षेत्रातील कामगार आयकर भरणारा नसावा. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी राज्य विमा योजनेचा सभासद नसावा.
- शासनाने निश्चित केलेल्या ३०० उद्योगांतील असंघटित कामगार असावा तसेच आधारकार्ड, बँक पासबुक, आधारकार्डशी लिंक असलेला मोबाइल क्रमांक असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दोन लाखांचा विमा मिळणार या योजनेचा सध्या एकच लाभ दिला जात आहे. तो म्हणजे ज्यांनी नोंदणी केली आहे. त्या असंघटित कामगारांचा मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आले तर २ लाख रुपये आणि अंशतः अपंगत्व आल्यास १ लाख रुपयांचा विमा लागू आहे.
योजनेसाठी कोणाला नोंदणी करता येणार? विविध ३०० क्षेत्रातील कामगारांना ई-श्रम कार्डसाठी नोंदणी करता येते. यात ऊसतोड कामगार, सुतारकाम करणारी व्यक्ती, बांधकाम कामगार, शेतीकाम करणारे, घरकाम करणाऱ्या महिला, आशासेविका व अंगणवाडी सेविका, ऑटोचालक/ रिक्षाचालक, वृतपत्र विक्रेते, दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी, फुटपाथवरील विक्रेते, पीठ गिरणी कामगार यांचा समावेश आहे