अर्ध्यावरती डाव सोडून दुर्योधन निघून गेला

By Admin | Updated: May 11, 2014 23:36 IST2014-05-11T23:36:32+5:302014-05-11T23:36:32+5:30

रविवार सकाळच्या सुमारास मुरमुरी जंगल परिसरातील पोर नदीच्या पुलावर नक्षल्यांनी अभियान आटोपून गडचिरोलीकडे परत येणार्‍या पोलीस जवानांच्या वाहनाला भुसुरूंग स्फोटात उडवून दिले.

Duryodhana left for half an hour | अर्ध्यावरती डाव सोडून दुर्योधन निघून गेला

अर्ध्यावरती डाव सोडून दुर्योधन निघून गेला

दिलीप दहेलकर - गडचिरोली

रविवार सकाळच्या सुमारास मुरमुरी जंगल परिसरातील पोर नदीच्या पुलावर नक्षल्यांनी अभियान आटोपून गडचिरोलीकडे परत येणार्‍या पोलीस जवानांच्या वाहनाला भुसुरूंग स्फोटात उडवून दिले. यात दुर्योधन नाकतोडे हा पोलीस जवान शहीद झाला. अचानक नियतीने घाला घातल्याने दुर्योधनला संसाराचा डाव अर्ध्यावरच सोडून पडद्याआड जावे लागले. देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील दुर्योधन मारोती नाकतोडे हा युवक २००६ मध्ये गडचिरोली पोलीस दलात सामील झाला. गेल्या ७ वर्षापासून सी-६० मध्ये कार्यरत राहून नक्षल्यांशी जिकरीचा लढा देत होता. शहीद दुर्योधनला दोन भाऊ आहेत. सर्वात मोठा शहीद झालेला दुर्योधन होता. मधला भाऊ हिवराज नाकतोडे हा शेती व्यवसाय करीत असून सर्वात लहान भाऊ प्रमोद नाकतोडे हा दुकान चालवितो. हे दोघेही भाऊ आई-वडीलासह कुरूड येथे वास्तव्यास राहतात. शहीद पोलीस जवान दुर्योधन नाकतोडे हा पत्नी व आपल्या दोन वर्षीय मुलांसह रामनगर येथे वंदना खोडस्कर यांच्या घरी गेल्या ७ वर्षापासून भाड्याने वास्त्यव्यास होता. अनेक वर्षे रामनगरात त्याच्या कुटुंबियांचे वास्तव्य असल्याने त्यांचे अनेकांशी घनिष्ठ संबंधही जुळले. दुर्योधनचा दोन वर्षाचा आदर्श नामक मुलाचा २९ एप्रिल रोजी तळोध (बाळापूर )नजीकच्या देवपायली येथे नवसाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर गडचिरोली येथे ४ मे रोजी आदर्शचा वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या दोन्ही कार्यक्रमादरम्यान दुर्योधन नाकतोडे यांची त्यांच्या नातेवाईकांशी भेट झाली. त्यापूर्वी दुर्योधनने आपल्या दोन वर्षीय मुलाचा शहीद अजय उरकुडे कॉन्व्हेंटमध्ये नर्सरीला प्रवेशही घेतला. मुलाला शिकवून मोठे करण्याचे स्वप्न दुर्योधन व मनिषा या दोघांनीही बाळगले होते. वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून ५ मे रोजी दुर्योधन सकाळी कर्तव्यावर गेला. त्यानंतर रविवारपर्यंत परत येणार असल्याचे दुरध्वनीवरून कुटुंबियांना सांगितले होते. पत्नी मनिषा व मुलगा आदर्श दोघेही त्याची वाट पाहत होते. मात्र नियतीने डाव साधून दुर्योधनला काळाच्या पडद्याआड केले.

Web Title: Duryodhana left for half an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.