पाणी टंचाईतून दिलासा

By Admin | Updated: April 11, 2016 01:32 IST2016-04-11T01:32:36+5:302016-04-11T01:32:36+5:30

जिल्हाभरात विशेष करून ग्रामीण तसेच दुर्गम भागात सौर ऊर्जेवर चालणाऱ्या ३३१ दुहेरी पंप नळ योजना बसविण्यात आल्या असून

Due to water scarcity relief | पाणी टंचाईतून दिलासा

पाणी टंचाईतून दिलासा

मोठ्या योजनांना पर्याय : ३३१ दुहेरी पंप नळ योजना जिल्ह्यात कार्यान्वित
गडचिरोली : जिल्हाभरात विशेष करून ग्रामीण तसेच दुर्गम भागात सौर ऊर्जेवर चालणाऱ्या ३३१ दुहेरी पंप नळ योजना बसविण्यात आल्या असून यातील बहुतांश योजना अजुनही सुस्थितीत सुरू आहेत. या योजनांमुळे ग्रामीण भागातील पाणी टंचाईची संकट कमी होण्यास फार मोठी मदत झाली आहे.

जलस्वराज्य योजना, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने मोठ्या योजना बांधून दिल्या जातात. मात्र या योजनांचा खर्च ग्रामपंचायतीला झेपत नसल्याने त्यातील बहुतांश योजना अगदी दोन ते तीन वर्षातच बंद पडत असल्याचा अनुभव आहे. गडचिरोली जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. जंगलामुळे पाण्याचे भरण जास्त होते व त्या तुलनेत पाण्याचा उपसा कमी आहे. परिणामी ३० ते ४० फूट अंतरावरच पाणी लागते. त्यामुळे या गावांमध्ये सौर ऊर्जेवर चालणारी नळ योजना सुरू केल्यास ती यशस्वी होईल. असे प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात २०१०-११ पासून दुहेरी पंप नळ योजना बांधण्यास सुरूवात झाली. सौर ऊर्जेवर चालणारी योजना असल्याने या योजनेचा खर्चही कमी आहे. थोडीफार देखभालीची गरज असल्याने ग्रामपंचायतीकडून या योजनांची मागणी वाढली. पाच वर्षात सुमारे ३३१ योजना बांधून पूर्ण झाल्या आहेत. यातील बहुतांश योजना सुस्थितीत अजुनही सुरू आहेत. या योजनांमुळे दुर्गम भागातील पाणी टंचाईची समस्या कमी होण्यास मदत झाली आहे. (नगर प्रतिनिधी)

ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ५० पेक्षा अधिक योजना बंद
योजनेचे बांधकाम झाल्यानंतर सदर योजना चालविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. मात्र योजना बंद पडल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासन याची दखल घेत नाही. त्यामुळे एकूण ३३१ योजनांपैकी ५० पेक्षा अधिक नळ योजना बंद असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पाच हजार लिटर क्षमतेच्या पाणी टाकीत पाणी साठविले जाते. यातून किमान २० ते ३० घरांना सहज नळाद्वारे पाणी पुरवठा होऊ शकतो. त्यांच्याकडून महिन्याकाठी पाणीपट्टी घेऊन त्यातील पैसे योजनेच्या देखभालीवर खर्च केल्यास सदर योजना अनेक वर्ष चालू शकते. मात्र ग्रामपंचायत प्रशासन या योजनेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, या योजनेतील सौर ऊर्जा सिस्टीमला बॅटऱ्या नाहीत. त्यामुळे देखभालीचा खर्च कमी झाला आहे.

Web Title: Due to water scarcity relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.