जिल्ह्यात वर्ग १ च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा दुष्काळ
By Admin | Updated: August 29, 2015 00:13 IST2015-08-29T00:13:20+5:302015-08-29T00:13:20+5:30
आरोग्य सेवेत अत्यंत महत्त्वाचे पद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ग १ च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३१ पदे मंजूर आहेत.

जिल्ह्यात वर्ग १ च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा दुष्काळ
निम्म्याहून अधिक पदे रिक्त : सात रुग्णालयांमध्ये वर्ग १ च्या डॉक्टरांचा अभाव
गडचिरोली : आरोग्य सेवेत अत्यंत महत्त्वाचे पद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ग १ च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३१ पदे मंजूर आहेत. मात्र त्यापैकी केवळ १३ पदे भरण्यात आली असून १८ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे सात रुग्णालयांमध्ये वर्ग १ चा एकही वैद्यकीय अधिकारी नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
शासन सेवेत रूजू झालेल्या पोलीस अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची सर्वप्रथम ग्रामीण व दुर्गम भागामध्ये नियुक्ती केली जाईल, असे आश्वासन शासनाच्या वतीने देण्यात आले होते. या आश्वासनानंतर गडचिरोली या मागास व नक्षलग्रस्त भागातील रिक्तपदांचा गुंता सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र हे आश्वासन प्रत्यक्षात उतरू शकले नाही. परिणामी अधिकारी वर्गाची ५० टक्क्याहून अधिक पदे अजूनही रिक्त आहेत. यापासून आरोग्य विभाग सुद्धा सुटला नाही.
गडचिरोली जिल्ह्यात वर्ग १ च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३१ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ १३ पदे भरण्यात आली असून सुमारे १८ पदे रिक्त आहेत. शिक्षणाबरोबरच कामाचा अनुभव राहत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात वर्ग १ ची पदे अत्यंत महत्त्वाची मानली जातात. रुग्णालयातील प्रशासकीय जबाबदारी सांभाळण्याबरोबरच त्यांच्या अंतर्गत काम करीत असलेल्या इतर वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी वर्ग १ च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अवलंबून राहते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात नेमक्या याच पदांचा दुष्काळ असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण रुग्णालय चामोर्शी, धानोरा, आष्टी, मुलचेरा, सिरोंचा, भामरागड, कोरची या सात ग्रामीण रुग्णालयांमध्ये एकही वर्ग १ चा वैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे वर्ग २ च्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडे कारभार सोपवून रुग्णालयाचा कारभार कसातरी हाकला जात आहे. त्याचबरोबर जिल्हास्थळावर असलेल्या सामान्य रुग्णालयात सुद्धा सुमारे ११ पदे रिक्त आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात खासगी रुग्णालयांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करू शकतील, एवढी ऐपतही येथील नागरिकांची नाही. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरच रुग्णांना अवलंबून राहावे लागते. मात्र डॉक्टरांच्या रिक्तपदांमुळे याही आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. रुग्णालयात जाऊनही डॉक्टर मिळत नाही. त्यामुळे ये-जा करण्याचा खर्च वाया जात असल्याने अनेक दुर्गम भागातील रुग्ण अंथरूनाला खिळून बसणे पसंत करीत आहेत. (नगर प्रतिनिधी)