पावसाअभावी धान पिकाचे पऱ्हे अर्धेच उगवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 05:00 AM2020-06-28T05:00:00+5:302020-06-28T05:00:44+5:30

मृग नक्षत्रातील पहिला पाऊस झाल्यानंतर शेतकºयांनी धानाचे पऱ्हे, आवत्या टाकण्यास सुरूवात केली. आवत्या व पऱ्हे टाकण्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. पऱ्हे टाकल्यानंतर एकदाही पाऊस आला नाही. मातीत लपलेले धान जमिनीतील ओल्यामुळे उगवले. मात्र वर असलेले धान ओलावा नसल्याने उगवले नाही. सदर धान पाखरांनी फस्त केले आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतात कमी ओलावा असल्याने धानाचे निघालेले कोंब करपून गेले आहेत.

Due to lack of rains, only half of the paddy crop was grown | पावसाअभावी धान पिकाचे पऱ्हे अर्धेच उगवले

पावसाअभावी धान पिकाचे पऱ्हे अर्धेच उगवले

Next
ठळक मुद्देआठ दिवसांपासून पावसाची दडी । शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. दिवसा कडाक्याची ऊन पडत असल्याने धानाचे पऱ्हे करपण्यास सुरूवात झाली आहे. तसेच पाऊस झाला नसल्याने पूर्णपणे बियाणे उगवली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार धानाचे पऱ्हे टाकण्याची पाळी आली आहे.
मृग नक्षत्रातील पहिला पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे, आवत्या टाकण्यास सुरूवात केली. आवत्या व पऱ्हे टाकण्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. पऱ्हे टाकल्यानंतर एकदाही पाऊस आला नाही. मातीत लपलेले धान जमिनीतील ओल्यामुळे उगवले. मात्र वर असलेले धान ओलावा नसल्याने उगवले नाही. सदर धान पाखरांनी फस्त केले आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतात कमी ओलावा असल्याने धानाचे निघालेले कोंब करपून गेले आहेत. केवळ ५० टक्के उगवले असल्याने शेतकऱ्यांना पुन्हा धानाचे पऱ्हे टाकावे लागणार आहेत.
धान पिकाबरोबरच चामोर्शी, मुलचेरा अहेरी, सिरोंचा परिसरातील शेतकरी सोयाबिन व कापूस पिकाची लागवड करतात. कापूस पिकाचे बी जमिनीत रोवले जाते. त्यामुळे या बियांना ओलावा राहत असल्याने त्या पूर्णपणे उगवल्या आहेत. बियाणांबरोबरच रासायनिक खतही दिले जाते. या खतामुळे पिकांना पाण्याची गरज भासते. सध्या कापसाचे पीक चांगले असले तरी आणखी काही दिवस पाऊस न झाल्यास कापूस पीकही संकटात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहे.

सर्वे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी
पाऊस झाला नसल्याने बहुतांश ठिकाणचे धानाचे पऱ्हे करपले आहेत. शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचा सर्वे करून तसा अहवाल शासनाकडे सादर करावा, अशी मागणी आहे. मागील वर्षीसुध्दा जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. त्यानंतर मात्र समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे रोवणीची कामे वेळेत आटोपली. पावसाअभावी धान पीक सुध्दा करपले नाही. परिणामी मागील वर्षी धानाचे व इतर पिकांचेही चांगले उत्पादन झाले.

संकरित बियाण्यांमुळे खर्च वाढला
दरवर्षी धान पिकाच्या नवीन जातींचा शोध लावला जाते. या नवीन जातीचे बियाणे कंपन्यांमार्फत पुरविले जातात. सदर बियाणे अतिशय महाग राहतात. १० किलोच्या बियाणांसाठी ७०० ते ८०० रुपये मोजावे लागतात. उत्पादनात वाढ होईल व अधिकचा भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकरी सदर बियाणे टाकतात. मात्र बियाणे करपल्यास शेतकऱ्यांना पुन्हा दुबार खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

Web Title: Due to lack of rains, only half of the paddy crop was grown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती